आ. यशवंत माने जात प्रमाणपत्र प्रकरणनागपूर खंडपीठाकडे केलेली सोमेश क्षिरसागर यांची याचिका फेटाळली
बुलढाणा जात पडताळणी विरोधात मागितली होती दाद
मोहोळ (कटुसत्य वृत्त ) :- अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. यशवंत माने यांच्याकडे असलेला हिंदू कैकाडी जातीचा दाखला बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून मिळविला असल्याच्या तक्रार बुलढाणा जात पडताळणी समितीने फेटाळून लावली होती. या पडताळणी समितीच्या निर्णयाच्या विरोधात मोहोळचे यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीचे शिवसेना उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांचे सुपुत्र सोमेश क्षीरसागर यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेली आ. यशवंत माने आणि त्यांचे बंधू हनुमंत माने यांच्या जात पडताळणी दाखल्याबाबत बुलढाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या विरोधातील याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. क्षीरसागर यांनी बुलढाणा जात पडताळणी समितीने दिलेला निर्णय नागपूर खंडपीठाने कायम ठेवत आ. यशवंत माने यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे आ. यशवंत माने यांच्या जात पडताळणीच्या पुर्नविचारा बाबतचा मुद्दा निकाली निघाला आहे.त्यामुळे याचिकाकर्ते सोमेश क्षिरसागर यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे असा दावा राष्ट्रवादीच्या गोटातून केला जात आहे.
आ. माने यांच्या शेळगाव (ता. इंदापूर, जि. पुणे) गावातील विलास देवराज भांगे यांनीही 2017 मध्ये आ. यशवंत माने यांच्या जातीच्या दाखल्या संदर्भात बुलढाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळी समितीकडे तक्रार केली होती. या प्रकरणात देखील भांगे यांची तक्रार 11 सप्टेंबर 2018 ला समितीने आम्हाला एखाद्या झालेल्या निर्णयावर पुन्हा पुर्ननिर्णय देता येत नाही या मुद्द्यावर फेटाळली होती. त्यानंतरच सोमेश क्षीरसागर यांनी नागपूर खंडपीठाकडे सदर जात पडताळणीच्या विरोधात याचिका दाखल केली होती.
महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (भटक्या जमाती), इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम 2000 नुसार व उच्च न्यायालयाच्या विविध न्याय निवाड्यानुसार समितीला पुर्ननिर्णयाचे अधिकार प्राप्त नसल्याचे कारण देत समितीने क्षीरसागर यांची तक्रार निकाली काढली होती. या निकालाविरोधात नागपूर खंडपीठाकडे क्षीरसागर यांनी याचिका दाखल केली होती. माझा आणि आमच्या संपूर्ण माने परिवाराचा न्यायव्यवस्थेवर सुरुवातीपासूनच पूर्ण विश्वास आहे. माझ्या विरोधकांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळल्याने याचिका दाखल करणाऱ्या विरोधकांच्या बौद्धिक क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आम्ही मोहोळ विधानसभा मतदार संघात सर्वत्र केवळ आणि विकास कामावर लक्ष केंद्रीत केले आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळेच विरोधकांना आता केवळ आमच्या माने परिवाराच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर राजकारण करावेसे वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून कायदा व सुव्यवस्थेचे भान राखून काम करणारा पक्ष आहे. मी निवडणूक लढविण्यापूर्वीच क्षीरसागर परिवारातील जात प्रमाणपत्राबद्दल शंकास्पद बाबी उजेडात आल्या होत्या. त्यांच्याकडे असलेली प्रमाणपत्रे कशाच्या आधारावर काढली आहेत ?या बाबीवर सध्या न्यायप्रविष्ट चौकशी सुरू आहे. असे असताना स्वतःच्या प्रमाणपत्राबद्दलच खात्री नसलेल्या विरोधकांनी माझ्या प्रमाणपत्रा बद्दल शंका उपस्थित करणे हे खेदजनक म्हणावे लागेल. विरोधकांनी केलेल्या आरोपांकडे लक्ष देण्यामध्ये आम्हाला कसलेही स्वारस्य नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि यापुढेही कायम विश्वास राहील.
आ. यशवंत माने
मोहोळ विधानसभा मतदारसंघ
बुलढाणा जात पडताळणी समितीकडे केलेली जात पडताळणीची तक्रार निकाली काढल्यानंतर आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली होती. एकदा या मुद्द्यावर यापूर्वी सुनावणी होऊन निकाल दिल्यानंतर आम्हाला पुन्हा एकाच तक्रारीची पुन्हा सुनावणी घेऊन पुर्ननिर्णय देता येत नाही असे म्हणत आमच्या तक्रारी अर्ज बुलढाणा जात पडताळणी समितीने निकाली काढला होता. केवळ पुर्ननिर्णयाच्या आमच्या तक्रारी विरोधात जात पडताळणी समितीने निकाल दिल्याने त्यांच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली आम्ही न्यायालयात याचिका दाखल केलेली फेटाळली आहे. आ. यशवंत माने यांच्या दाखल्या बाबतचे पुराव्यानिशी केलेली याचिका अद्याप न्यायालयीन प्रतिक्षा प्रक्रीयेत आहे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या निकालाची प्रत प्रसारमाध्यमांना देऊन विद्यमान आमदार काय सध्या करत आहेत हेच समजत नाही. खरी न्यायालयीन लढाई आता सुरू होणार आहे. आम्ही त्यांच्या जातीच्या दाखल्याच्या पडताळणी विरोधात निश्चितपणे वरिष्ठ न्यायालयीन स्तरापर्यंत दाद मागणार आहोत.
सोमेश क्षिरसागर
याचिकाकर्ते तथा शिवसेना युवा नेते
0 Comments