देशाच्या संरक्षणासाठी सर्वस्व त्याग केलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “ एक दिवस सैनिकांसाठी ” या उपक्रमाचे आयोजन - संतोष राऊत
सोलापूर ( कटूसत्य वृत्त ) :- "सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून आज “ एक दिवस सैनिकांसाठी ” या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आरंभ होत आहे. देशाची सीमा व देशांतर्गत संरक्षणासाठी भारतीय सेनेचे सैनिक आपले घर-दार, कुटुंब यांचा त्याग करुन आपली सेवा देत आहेत. एक दिवस सैनिकांसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे." अशा शब्दात या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संतोष राऊत, गट विकास अधिकारी यांनी भावोद्गार काढले.
दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता सांगोला पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये एक दिवस सैनिकांसाठी या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या वीरांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी यांचा सभापती, उप सभापती, गट विकास अधिकारी यांच्याहस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.
सांगोला पंचायत समितीच्या सभापती राणीताई कोळवले, उप सभापती तानाजी चंदनशिवे, मेजर आनंद व्हटे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करुन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमास 26 माजी सैनिक उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून 15 निवेदने प्राप्त झाली असून ही निवेदने संबंधित कार्यालय- विभागास पाठवून तक्रारींचे निराकरण करण्याबाबत कळविण्यात येईल असे गट विकास अधिकारी यांनी सांगितले.
या कार्यक्रमास गट शिक्षणाधिकारी प्रकाश यादव, बाल विकास प्रकल्प अधिकारी आस्मा आतार, बांधकाम विभागाचे उप अभियंता जगन्नाथ मुळीक, पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी आयुब बागवान तसेच पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, बांधकाम उपविभाग, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावण घाडगे, विस्तार अधिकारी पंचायत यांनी केले.
सांगोला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये सुद्धा सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने सर्वत्र आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सदर नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
"आजी माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना पंचायत समितीच्या माध्यमातून शक्य तेवढी मदत केली जाईल. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू."
-- राणीताई कोळवले. सभापती, पंचायत समिती, सांगोला.
0 Comments