Hot Posts

6/recent/ticker-posts

बहुप्रतिक्षीत ' जिगरी ' चित्रपट लवकरच ओटीटी वर प्रदर्शित होणार.. सोलापूरच्या दोन युवकांचे स्वप्न साकार

 बहुप्रतिक्षीत ' जिगरी ' चित्रपट लवकरच ओटीटी वर प्रदर्शित होणार.. सोलापूरच्या दोन युवकांचे स्वप्न साकार


सौंदणे (कटुसत्य वृत्त ) :- सोलापूर जिल्ह्यात निर्माण व चित्रीकरण झालेला बहुप्रतीक्षित ' जिगरी ' हा चित्रपट लवकरच एमएक्स प्लेअर,अमेझॉन प्राईम, एअरटेल एक्स्ट्रेम अश्या अनेक प्लॅटफॉर्म वरून प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून सोलापूरच्या दोन युवकांचे स्वप्न साकार होणार असून राहुल राजे यांचा अभिनय व प्रविण चौगुले यांच्या लेखणीची कमाल प्रेक्षकांना लवकरच पहायला मिळणार आहे.
      आई असूनही जन्मतःच आईच्या मायेला पोरका झालेला राजा समाजाचे टोचणारे घणाघाती बोल ऐकत ऐकत मोठा होतो.त्याचा काहीही दोष नसताना समाज त्यालाच का टोचून बोलतोय या प्रश्नाच्या उत्तराने एकीकडे त्याचा जीव कुरतडला जातोय तर दुसरीकडे त्याची बहीण चिऊ व मित्र हसन त्याला जीवनाचे सार सांगत जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्यास सांगत असतात.अशातच त्याच्या आयुष्यात दीपा येते.दीपासाठी काहीही करायला तो मागेपूढे पाहत नाही.पण जेव्हा तो दीपाच्या वडिलांनी घातलेली अट पूर्ण करुन तिच्या घरी जातो.तिथे जे घडत असते ते पाहून त्याचा स्वतःवरील ताबा सुटतो.या समाजाबद्दल त्याच्या मनात एवढी चीड निर्माण होते कि तो सगळ्या समाजाचाच बदला घेण्याचे हसनजवळ बोलून दाखवतो.हसन राजाला यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न करतो.पण राजा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो.मग हसन कोणता पर्याय निवडतो? तो योग्य होता कि अयोग्य? पश्चातापाने हसनचे शेवटी काय होते? या प्रश्नांची उत्तरे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.
    या चित्रपटाचे चित्रीकरण वाघोली,सोलापूर,पंढरपूर व दादासाहेब फाळके चित्रनगरी,मुंबई येथे पूर्ण करण्यात आले.या चित्रपटात राहुल राजे यांची मुख्य भूमिका असून पूजा चांदुरकर, जयंत वाडकर, गौरव मोरे, विनीत शहा, शीतल यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.जिगरी चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद प्रविण चौगुले यांचे असून कार्यकारी निर्माता म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. निर्माते रश्मी अजय शहा, हिमांशू प्रकाश शहा असून दिग्दर्शन किरण गांगुर्डे यांनी केले आहे. संगीत राष्ट्रीय पुरस्कार विजेते रोहित नागभिडे यांनी दिले आहे तर आदर्श शिंदे यांनी मराठीतील सर्वात भावनिक व  हृदयस्पर्शी गीत गायले आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण शांताराम भोसले यांनी केले आहे.
      हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल व काहीतरी नविन पाहिल्याचा अनुभव ही त्यांना मिळेल असा विश्वास अभिनेते राहुल राजे व लेखक प्रविण चौगुले यांनी व्यक्त केला आहे.
राहुल राजे विषयी...
पंढरपूर तालुक्यातील बोहाळीसारख्या खेडेगावात राहणाऱ्या राहुल राजे यांचा जिगरी हा पहिला चित्रपट असून
यापूर्वी राहुल यांनी 'अस्मिता' 'प्रेमा तुझा रंग कसा', शौर्य, महाराष्ट्र जागते रहो, छत्रीवाली, अस्सं सासर सुरेख बाई अश्या जवळ जवळ १२ मालिकामध्ये सहाय्यक भूमिका केल्या आहेत.याशिवाय ये रे ये रे पैसा, दाह,कान्हा अश्या चित्रपटांमधूनही त्यांनी सहाय्यक भुमिका केल्या आहेत.सामाजिक क्षेत्रातसुद्धा त्यांचे भरीव काम आहे. राहुल यांचे लहानपणापासूनच अभिनेता बनण्याचे स्वप्न होते.त्यामुळे त्यांनी एमबीए झाल्यानंतर गुरुवर्य संजय फुलोरीया यांच्याकडून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. राहुल यांचे वडील शेतकरी व आई शेतमजूरी करीत असून चार बहिणी आहेत.राहुल राजे यांचा मुंबई मायानगरीत अथक परिश्रम,उपासमार सहन  केल्यानंतर मुख्य भूमिका असलेला हा पहिलाच चित्रपट आहे.
प्रविण चौगुले विषयी...
जिगरी चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद लिहीलेले प्रविण चौगुले हे मोहोळ तालुक्यातील वाघोलीचे आहेत.आई वडील शेती करत असून आर्थिक परिस्थिती यथातथाच आहे.घरप्रपंचा चालविण्यासाठी त्यांनी खूप वर्ष जेसीबी अॉपरेटर म्हणून काम पाहिले. शिक्षण फारसे नसले तरी चित्रपट पाहण्याची विलक्षण आवड असल्याने चित्रपटाविषयी ओढ निर्माण झाली.त्यातूनच आपणही एखादा चित्रपट लिहायचा असा ध्यास लागला.मित्र राहुल राजेंच्या संगतीने त्यांनी चित्रपटसृष्टीचा आधी संपूर्ण अभ्यास केला आणि मगच जिगरी हा चित्रपट लिहून पूर्ण झाला.चित्रपट आकाराला यायचा असेल तर त्यासाठी निर्माता हवा.सलग तीन वर्षे प्रविण चौगुले यांनी शेकडो निर्मात्यांचे उंबरठे झिजवले.पण निर्माते तयार होत नव्हते.शेवटी शहा अॅण्ड शहा प्रॉडक्शनचे शहा बंधू चित्रपट निर्मितीसाठी तयार झाले आणि लवकरच प्रविण चौगुले यांचे स्वप्न साकार होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments