Hot Posts

6/recent/ticker-posts

नूतन पोलीस अधीक्षकांच्या ॲक्शन मोडमुळे मोहोळ नदीकाठावरील वाळूतस्कर गारठले

नूतन पोलीस अधीक्षकांच्या ॲक्शन मोडमुळे मोहोळ नदीकाठावरील वाळूतस्कर गारठले

नदीकाठावरील अनेक पोलीस ठाण्यातील अर्थकारणही थंडच
वाळू तज्ञांच्या शिस्तीची उजळणी सुरू

          मोहोळ (साहिल शेख):- सोलापूर जिल्ह्यातील बेकायदा वाळू उपसा आणि वाहतुकीवर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अभूतपूर्व अंकुश बसला असून सोलापूर जिल्ह्याच्या वाळू क्षेत्राला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे नदीकाठच्या पोलीस ठाण्यात बदलून गेलेल्या वरकमाई बद्दल वाळू वसूलदारांच्या पदरी मोठी निराशा पडली आहे.

          शिवाय पोलीस अधिक्षक सातपुते यांनी यापूर्वीच्या पोलिस अधीक्षकांच्या काळात बंद असलेले विशेष कारवाई पथकाची पुन्हा स्थापना करून जिल्ह्यातील नदीकाठावरील पोलीस स्टेशनवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी कडक पाऊल उचलले आहे. त्याचा मोठा परिणाम मोहोळ तालुक्याच्या वाळू विश्वावर झाला असून अनेक डंपर आणि टेम्पो चालक आपापली वाहने घरापुढे उभी करून तीर्थयात्रेसाठी रवाना झाले आहेत. मोहोळ पोलिस स्टेशन आणि तहसील आवारात वाळूचे अनेक टेम्पो व अन्य वाहने जप्त स्वरूपात आढळून येत असल्याने या व्यवसायात नव्याने प्रवेश करणाऱ्यांना धोक्याची घंटा स्पष्टपणे जाणवत आहे. 

          दरवर्षी पोलीस प्रशासनाच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या दरम्यान  बहुतांश कर्मचार्‍यांना नदीकाठची पोलीस स्टेशन हवी असतात. त्याला कारणही तसंच असतं ते म्हणजे वाळूचे अर्थकारण आणि वाळूची सोलापूर जिल्ह्यात होणारी तस्करी. गेल्या काही वर्षांपूर्वी म्हणजे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन शिस्तप्रिय पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सोलापूर जिल्ह्याचे कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास भूमाफिया बरोबर वाळूमाफियां देखील कारणीभूत असल्याचा अभ्यासू निष्कर्ष सरासरी  गुन्हेगारी आकडेवारी वरून काढला होता. त्यावेळी आरटीओ, पोलिस आणि महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई मोहीम राबवून त्याकाळी अनेक वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या होत्या. शिवाय अनेक निर्ढावलेले आणि प्रख्यात वाळू तस्करांना तडीपार केले तर कधी त्यांच्यावर एम. पी. डी. ए. सारखी कारवाई  देखील केली. त्यामुळे वाळू क्षेत्राला अभूतपूर्व हादरा देत त्यांनी जिल्ह्यातील जवळपास ८५ टक्के वाळूचोरी रोखून धरली होती. जिल्ह्याच्या वाळूचोरी रोखण्याच्या कार्यशैलीवर विरेश प्रभू यांच्याच शिस्तप्रिय कार्यपद्धतीचा प्रभाव त्या काळी जाणवला. नंतरच्या दोन वर्षाच्या काळात मात्र सोलापूर जिल्ह्यातील वाळू माफिया पुन्हा शेफारले. त्यामुळे वाळू क्षेत्रात संघटित गुन्हेगारीचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला होता. सोलापूर जिल्ह्यात पोस्टिंग घेणे आणि नदीकाठावर पोलीस स्टेशन मिळवणे यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अधिकार्‍यांमध्ये वशिल्याचे लॉबिंग सुरू झाले. विशेष म्हणजे तत्कालीन पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सुरू केलेले पोलीस अधीक्षक कारवाई पथक देखील यापूर्वीचा पोलीस अधीक्षकांच्या काळात हळूहळू बरखास्त करण्यात आले. यामुळेच वाळू माफियाना वाळू उपशासाठी जणू मोकळीक मिळाली. 

          कोट्यावधी रुपयांची वाळू बेमालूमपणे उपसा करून ती सोन्याच्या भावाने बाजारात विकून रातोरात करोडपती झालेल्या अनेक व्हाईट कॉलर वाळूवाल्यांनी मोहोळ शहर आणि तालुक्यात पुन्हा सुरू केला होता. मोहोळचे नूतन पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनीही पदभार घेताच वाळू वाहतुकीवर आक्रमकपणे कारवाई सुरू केली आहे. त्याच कारवाईला आता पोलिस अधीक्षकांच्या कारवाई पथकाचे सहकार्य मिळाल्याने आणखीनच कारवाईचा फास आवळला गेला आहे. सर्वांना प्रतीक्षा होती ती जिल्हा पोलिस प्रशासनातील शिस्त शिथिल कधी होते आणि पुन्हा आम्ही कधी वाळू उपसा करू. मात्र पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी विशेष कारवाई पथक निरंतर कारवाई करतच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने वाळू माफियांमध्ये धास्तीचे पुन्हा वातावरण पसरले आहे. 

          सोलापूर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार दोन महिन्यापूर्वी स्वीकारलेल्या नूतन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वाळू माफियांना रोखण्याचे आव्हान दक्षपणे स्वीकारत वाळू उपसा आणि वाहतूक विरोधात कडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. मोहोळ तालुक्यात अंदाजे दीड कोटीचा मुद्देमाल या वाळू कारवाईमध्ये जप्त झाल्याने मोहोळ तालुक्याच्या अवैध वाळू वाहतुकीचे कंबरडे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सूचनेनुसार विशेष कारवाई पथक आणि मोहोळ पोलीस ठाण्यांने मोडले आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या स्वतः पेट्रोलींगसाठी अधून-मधून जिल्हाभर असल्याने जिल्ह्यातील अंतर्गत भागातील वाळू वाहतुकीला चांगलाच ब्रेक बसला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments