ऊस कोंडी फोडण्यासाठी कारखान्यांना लेखी सूचना द्या शिवसेना युवा नेते नागेश वनकळसे यांची साखर आयुक्तांना मागणी

मोहोळ (क.वृ.): उसाचा गळीत हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी झाला असतानादेखील कारखानदारांनी उद्यापर्यंत ऊस दराची कोंडी फोडलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे या प्रकरणात साखर आयुक्तांनी लक्ष घालून ऊसदराची कोंडी फोडण्यात बाबतच्या लेखी सूचना जिल्ह्यातील कारखानदारांना द्याव्या अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते नागेश वनकळसे यांनी निवेदनाद्वारे केली. याबाबतचे निवेदन साखर आयुक्तांना देण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात विविध कारखान्यांमध्ये साधारणपणे ५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तरीही कारखानदार ऊसदर जाहीर करण्यामध्ये गाफील आहेत. तसेच
एफआरपी हा ऊसाचा अंतिम दर नाही. कारण सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार कारखान्याच्या महसुली उत्पन्नावर आधारित दर देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार साखर व उपपदार्थाच्या एकूण उत्पन्नातील ७५ टक्के पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागतात. तोच अंतिम भाव ठरत असतो. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी किमान एफआरपी नुसार तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा दर जाहीर करून अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे पुण्य वाटून घेण्याचे आवाहन शिवसेना नेते नागेश वनकळसे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
या प्रकरणी दहा दिवसात ऊसदराची कोंडी न फुटल्यास पुणे साखर आयुक्त कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा देखील नागेश वनकळसे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन अर्थ विभागाचे साखर संचालक ज्ञानदेव मुकणे यांनी स्वीकारले असून या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याची मान्य केले आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसात ऊसदराची कोंडी फुटणार म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
0 Comments