ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 4, 2020

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन 

मुंबई(क.वृ.): युनेस्को आणि लंडन मधील वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणारा सन 2020 चा ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाल्याबद्दल रणजितसिंह डिसले यांचे राज्य शासनाच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी पत्र पाठवून हार्दिक अभिनंदन केले आहे.

प्रा. गायकवाड यांनी पत्रात म्हटले आहे कीया पुरस्कारासाठी जगभरातील 140 देशातून प्राप्त झालेल्या 12 हजार नामांकनांमधून आपली निवड झाली ही बाब अभिमानास्पद आहे. हा पुरस्कार मिळविणारे आपण पहिले भारतीय शिक्षक ठरले आहात. पुरस्काराबरोबर मिळालेल्या रू. सात कोटी रकमेतून अर्धी रक्कम आपण अंतिम फेरीतील विविध देशातील नऊ शिक्षकांमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून आपली शिक्षणविषयक तळमळ व विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता जगातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची आपली मानसिकता दिसून येते. यातून आपल्याकडील दुसऱ्याला देण्यामध्ये आनंद घेण्याची वृत्ती दिसून येते.

प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. यामध्ये शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तळागाळातल्या मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणासाठी आपण अथक व विषेश प्रयत्न केल्यामुळे मुलींची शाळेतील गळती थांबली व बालविवाहांना आळा बसला.

क्युआर कोडचा वापर करून पाठ्यपुस्तकातील कविता व पाठाबद्दल अधिकची माहिती मिळविता येते या आपल्या नावीन्यपूर्ण कल्पकतेला मायक्रोसॉफ्ट फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला आहे. आपणासारखे आपल्या कामावर निष्ठा असणारेविद्यार्थ्यांविषयी तळमळ असणारे आणि तन मन धनाने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी झटणारे शिक्षक असल्यामुळे महाराष्ट्रातील व देशातील विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.

भविष्यात शासकीय यंत्रणाशिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांच्यामध्ये समन्वय वाढवून राज्यातील तसेच देशातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी आपण नेटाने प्रयत्न करूया.

अंतिम यादीतील सगळ्या शिक्षकांकडे एकसारखीच गुणवत्ता आहे. मी फक्त निमित्त आहे. दुसरे म्हणजे अंतिम यादीतील नऊ शिक्षक जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम खर्च करतील तेव्हा शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडेल. हे आपले म्हणणे व कृती आपल्या देशाच्या महान परंपरेला साजेशी आहे. यामुळे देशाची व महाराष्ट्राची मान निश्चितच उंचावली आहे, असेही प्रा.गायकवाड यांनी अभिनंदन करताना म्हटले आहे.

यापुढेही आपण अशाच प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये आपले नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धिंगत करावीही अपेक्षा व्यक्त करून रणजितसिंह डिसले यांच्या पुढील वाटचालीस प्रा.गायकवाड यांनी  मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages