राष्ट्रवादीच्या ताब्यात नगरपरिषद असूनही प्रभाग क्रमांक बाराला इतर प्रभागाप्रमाणे निधी का मिळाला नाही ?
कोणाच्या तरी राजकीय सोयीसाठी प्रभागाची गैरसोय कशाला ?
डॉ .संग्राम गायकवाड यांचा सुचक सवाल

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक १२ हा ग्रामपंचायतीच्या काळात शिवसेनेचा बालेकिल्ला होता. नंतर नगर परिषदेच्या काळात सर्व समविचारी व्यक्तींनी परिश्रम घेऊन या प्रभागातून राष्ट्रवादीचा उमेदवार प्रभागातील स्थानिक नसूनही मोठ्या अपेक्षेने निवडून आणला. राष्ट्रवादीची सत्ता नगरपरिषदेत असूनही पक्षाचे उमेदवार निवडून आलेल्या इतर प्रभागांना ज्या प्रमाणात निधी मिळू शकला त्या प्रमाणात या प्रभागाला का निधी मिळाला नाही ? असा खडा सवाल या प्रभागातील अभ्यासू सामाजिक कार्यकर्ते तथा प्रभाग प्रमुख डॉ. संग्राम गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
जर या प्रभागात अपेक्षित गतीने विकासकामे झाली असती तर प्रभागातील जनतेने आहे त्याच उमेदवाराला मोठ्या बहुमताने निवडून आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले असते. मात्र प्रभागात नगरपरिषदेच्या सत्ता कालावधीच्या अखेरच्या काळात मोजकाच निधी देऊन या प्रभागातील सामान्य जनतेला नगरपरिषदेच्या कारभाऱ्यांनी नाराज केल्यामुळे प्रभागातील जनता नाराज आहे. बाहेरूनच चार दोन कॉंक्रीट रस्ते करून आतमध्ये आहे तसाच प्रभाग बकाल ठेवण्यातच विद्यमान कारभाऱ्यांनी धन्यता मानली. त्यामुळे हा प्रभाग विकाससंपन्न करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. तो निधी आणू शकला नाही तरीही नगरसेवकपद मिळवण्याचा दावा इतरांनी का करावा ? आताही सूचक सवाल गायकवाड यांनी व्यक्त केला. राजकारण करणे हा आपला पिंड नाही मात्र जनतेचीही विकास कामे पूर्ण होण्याबाबतची नाराजी काढण्यासाठी मला नगरपरिषदेच्या मैदानात उतरून ही निवडणूक लढवावीच लागेल असेही संग्राम गायकवाड म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत आपण ही निवडणूक लढवणारच असून माझी उमेदवारी ही केवळ प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आहे. माझा कोणत्याही व्यक्तीला अथवा पक्षाला विरोध नाही. तर माझा विरोध आहे विकासाबाबत गहाळ असणाऱ्या आणि पडद्याआड प्रभागाच्या नावावर स्वतःच्या फायद्याचे व्यापारी राजकारण करणाऱ्या सर्व इच्छुकांना आहे. दबावाचे राजकारण वापरून जर कोणी राजकारणात उतरणार असेल तर आमच्या प्रभागातील संयमी आणि शिस्तप्रिय जनता अशा व्यक्तींना त्यांची जागा दाखवून देईल असाही इशारा गायकवाड यांनी दिला. कोणाची तर राजकारणात सोय करण्यासाठी आमच्या प्रभागाची विकासाबाबत गैरसोय करणे अत्यंत चुकीचे आहे. प्रभागातील कर्तबगार व्यक्तींनाही उमेदवारीबद्दल विचारणा होणे गरजेचे असताना ठराविक व्यक्तीचे नाव पुढे रेटून अन्य इच्छुकांना दुर्लक्षित करणे सर्वच पक्षांना निश्चितपणे महागात पडू शकते असाही इशारा गायकवाड यांनी दिला.
इतर प्रभागात कोट्यवधी रुपयांचे विकासकामांचे नारळ फुटत असताना प्रभाग क्रमांक बाराच्या वाट्याला केवळ चार दोन कामांचे कवचल अन खोबरे आले. अशा प्रकारे आपल्या प्रभागाची जुजबी कामावरच बोळवण करण्यात आल्यामुळे प्रभागातील सर्वसामान्यांना हक्काचा निधी म्हणाव्या तशा प्रमाणात मिळू शकला नाही अशीही खंत यावेळी गायकवाड यांनी व्यक्त केली.
प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत झाल्यानंतर आरक्षणाचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असून प्रभागातील सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊनच माझ्या उमेदवारीचा पक्ष ठरणार असुन अनुकूल आरक्षण सोडत झाल्यास आपण कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणारच. नगरपरिषद स्तरावरील निधी जास्तीत जास्त प्रमाणात योग्य त्या वेळेत प्रभागात येणे आवश्यक आहे. त्यामधून पाणी आरोग्य आणि स्वच्छतेच्या समस्या सोडवण्यास आपण प्राधान्य देणार असून उर्वरित रस्त्यांची कामे कशी मार्गी लागतील यासाठी ही प्रयत्नशील राहणार आहे. लवकरच प्रभागातील सर्वपक्षीय नागरिकांची एक बैठक बोलावून उमेदवार कसा असावा आणि त्याच्याकडून प्रभागातील विकासाबाबतच्या अपेक्षा काय असाव्यात याबाबत चर्चा आणि विचार विनिमय करण्यासाठी बैठक बोलावणार आहे. - डॉ. संग्राम गायकवाड (प्रभाग प्रमुख, प्रभाग क्रमांक १२)
0 Comments