राष्ट्रवादीच्या जोमदार पिकात गटबाजीचे तण वाढले
तरीही थोरले अन धाकले पवार साहेब अनभिज्ञ कसे ?
चमकोगिरी करणाऱ्यांची गाडी सुसाट
निष्ठेने पक्षकार्य करणाऱ्यांचे मात्र ट्रॅफिक जाम


मोहोळ (साहील शेख):- राज्याच्या राजकारणात आपल्या अलौकिक संघटन कौशल्याचा ठसा उमटविणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मनात काय येईल आणि कधी कुणाचा राजकीय गेम होईल याचा मात्र कसलाही भरोसा नसतो.मात्र गेल्या वर्षभरापासून अजित दादा पवार यांचे जिल्ह्यातील राजकीय घडामोडी वर अत्यंत बारकाईने लक्ष आहे. तरीही पक्षात राहुन अनेक जण पक्षाच्याच विरोधात गमती जमती करताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षासाठी निष्ठावंत कोण ? पक्षाला थेट विरोध करतेय कोण? बाहेरच्या पक्षात राहून राष्ट्रवादी पक्षाला सोयीचे वातावरण कसे होईल याची सविस्तर गोळाबेरीज अजितदादांच्या मनामध्ये ठाण मांडून आहे.मात्र तरीही दादा गप्प कसे ? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन वर्षापूर्वी अजितदादा पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला मोहोळ मध्ये आले होते. त्यावेळी अजितदादा पवार यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार जेलमध्ये असल्यामुळे सदर मतदारसंघाचे पालकत्व मी घेत असल्याची जाहीर कबुलीही दिली होती. अजितदादांनी जाहीर कबुली देऊन तीन वर्ष झाली. सत्ता येताच उपमुख्यमंत्री अजितदादांनी मोहोळ तालुक्याचे विकासात्मक जडणघडणीच्या मदतीसाठी गतिमान भूमिका घेतली. माजी आमदार राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने या राजकीय जोडीने मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला मोहोळ सारख्या शहरातील नगरपरिषदेसाठी प्रथमच तब्बल १५ कोटींचा निधी मंजूर करून दहा कोटीची विकास कामे देखील पूर्ण केली.
यापुर्वी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही दिशेला गेले तरी काटेरी झुडपे वाढलेली रस्ते, प्रत्येक गावामध्ये आलेला विकासाचा बकालपणा, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, असो किंवा विजेची समस्या असो कोणत्याही समस्येबाबत आवश्यक त्या ताकदीने पक्ष आवाज उठवण्यास तयार नसे. या पुर्वीचे सत्ताधारी आपल्याच पक्षाचे गोडवे अन जाहीरातबाजी करण्यात व्यस्त होते. तर विरोधक असल्याने आपले आता काही चालेना म्हणून राष्ट्रवादी नेते त्रस्त असायचे. आजवरच्या वाटचालीत तालुक्याच्या विकास कामांमध्ये जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे योगदान मोठे असले तरी गेली पाच वर्षांत सत्ता नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी सामसूम असे.
मात्र सत्ता आल्यानंतर सत्तेच्या झाडाची फळे टाकण्यासाठी अनेक चाणाक्ष पक्षी त्या झाडावर अलगद येऊन बसले. जिल्ह्याच्या राजकारणात विरोधकांना टक्कर देत प्रचंड आशावदी म्हणणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या अंतर्गत गटबाजीमुळे स्वतःच बेजार होऊन बसला आहे. एकेकाळी मोहोळ तालुक्याच्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट असताना आता तीन नव्हे तब्बल चार गट सक्रिय झाले आहेत. त्यामुळे दादांनी या गटबाजी बद्दल गांभिर्याने काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद निवडणूक असो किंवा पंचायत समिती निवडणूक असो ग्रामपंचायत असो किंवा इतर कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो इतर सर्वच पक्ष सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टारगेट करून विरोधक एकत्र आणतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अंतर्गत गटबाजी ही मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. गटबाजी नाहीशी करण्यापेक्षा गटबाजीला संपवुन मनोमिलने घडवुन पक्ष एकसंध करण्याचे मोठे आव्हान अजितदादा पवार यांच्यासमोर यापुढील काळात असणार आहे. ही समस्या केवळ मोहोळ तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीला अंतर्गत गटबाजीने ग्रासले आहे. यापूर्वी अनेकदा जिल्हाध्यक्षासह इतर महत्वाच्या पदावर घराणेशाहीची आणि धनिक नेत्यांच्या नातेवाईकांची वर्णी लावुन पक्षाने काय साध्य आणि काय सिद्ध केले ? हे पक्षालाच माहित.
अनेकदा मोठा कार्यक्रम असला की व्यासपीठावर एकमेकांशी हस्तांदोलन करत करत हम साथ साथ है असे म्हणत नकली स्मित हास्य करणारी जिल्ह्यातील नेतेमंडळी कार्यक्रमानंतर मात्र हम आपके है कोन? च्या भूमिकेत वावरताना दिसतात हे कुणीही नाकारत नाही.
जसा काळ बदलला तसा राजकारणाची व्याख्या देखील बदलली. ज्यांनी वाईट काळात पक्षासाठी कडू वाळके तोडले, ज्यांनी पक्षासाठी अनेक नरक यातना सोसल्या त्यांना सत्तेच्या काळात पक्ष मात्र नेहमीच वाऱ्यावर सोडतो. ज्या ज्या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडीचा धर्म प्रामाणिकपणे पाळत काँग्रेस पक्षाला भरीव मदत केली तोच काँग्रेस पक्ष सत्ताकाळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघांना सोयीने विसरतो. येत्या काळात होऊ घातलेल्या अनेक निवडणुकीपूर्वी पक्षश्रेष्ठींना गटबाजीचे पॅचअप तर करावेच लागेल मात्र सहकारी काॅग्रेंस पक्षाकडून राष्ट्रवादीला मिळणाऱ्या वागणुकीबाबतही संबंधित दिवस रात्र प्रचार करून मतदान केलेल्या त्या उमेदवारांना राष्ट्रवादीने केलेल्या मदतीची जाणीव करून देणे आवश्यक आहे अशी भावना प्रामाणिक कार्यकर्त्यांची असणार आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ही साखर कारखानदारांची शिक्षण सम्राटांची आणि विकसित नेत्यांची तर कधी ठेकेदारांची अशीच ओळख जणू काही वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. मात्र यातीलच काही कारखानदार, शिक्षण सम्राट व इतर विकसित नेत्यांनी आता सत्तेमधील पक्षांना हाताशी धरून आपली चूल वेगळी मांडत पक्षाला चॅलेंज करत सवतासुभा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आज जिल्हा परिषदे सारखी महत्त्वाची सत्ता संख्याबळ हातात असतानाही गेली. जिल्हा मध्यवर्ती बँके सारखी महत्त्वाची संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून निसटताना सर्वांनी आँखो देखा हाल पहिली. त्यामुळे ही बाब चाणाक्ष अजितदादांच्या नजरेतून सुटली नाही तरीही अजितदादा तिकडे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची सत्ता येण्यापूर्वी भाजपच्या काळात पक्षाला विरोध करणाऱ्या त्यां नेत्यांच्या घरचा पाहुणचार कसा स्वीकारतात ? हे निष्ठावंत कार्यकर्त्यांना पडलेले मोठे कोडे आहे.
अजितदादांना जे चालत नाहीत ते थेट मोठ्या साहेबांना जाऊन भेटून मी पक्षाचाच आहे असे म्हणून पक्षश्रेष्ठींची नव्हे तर स्वतःचीही दिशाभुल करताना दिसत आहेत. साडेचार वर्ष राष्ट्रवादी पक्षाला विरोध करायचा आणि शेवटच्या सहा महिन्यातील मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभांना थेट व्यासपीठावरच अवतरायचे आणि मी आता पक्षाचाच आहे हे ढोंग पुन्हा सत्ता येणार म्हणुन करायचे ही गोष्ट आता जास्त दिवस चालणार नाही. हे सर्व पक्षश्रेष्ठींच्याही ध्यानात आले आहे मात्र मनात कधी येणार. येत्या काळात होणाऱ्या, विधान परिषद नगरपरिषद आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीपूर्वी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजीचे उच्चाटन व व्यवसायिक धोरणाने चमकोगीरीचे पक्षकार्य करणाऱ्या डबल गेमच्या गद्दांराना थारा देणे बंद नाही झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक बालेकिल्यामध्ये विविध निवडणुकात स्वतःच्याच गहन चुकांमुळे पुन्हा पराभूत होण्याची दाट शक्यता केवळ मोहोळच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील पक्षाच्या हुकमी मतदारसंघांमध्ये जाणवत आहे हे मात्र नक्की.
0 Comments