पंढरपुरात ज्येष्ठ नागरिकांची सन्मान यात्रा'
सात हजार रुपये पेन्शन देण्याची सरकारकडे मागणी
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देण्याची घोषणा केली होती. मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यभरातील काही ज्येष्ठांनी आज येथे सन्मान यात्रा काढली. संत नामदेव पायरीवर अकरा हजार पत्र ठेवत सरकारला सुबुद्धी दे, अशी प्रार्थना केली.
अर्थक्रांती जीवन गौरव अभियान अंतर्गत पंढरपूर येथे सन्मान वारी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत संघटनेचे राज्य उपाध्यक्ष घनश्याम दायमा यांनी माहिती दिली. ते म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देण्याची घोषणा विद्यमान सरकारने केली होती. मात्र, याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आली नाही.
यामुळे सरकारवर दबाव आणण्यासाठी तसेच आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी राज्यभरातून लाखो पत्र पाठविण्यात येणार आहेत. यापैकी प्रातिनिधीक स्वरूपात अकरा हजार पत्र संत नामदेव पायरीवर ठेवण्यात आली. तसेच सरकारला याबाबत निर्णय घेण्याची सुबुद्धी मिळू दे, अशी प्रार्थना करण्यात आली.
येत्या काळात अशी हजारो पत्रे पाठवण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिकांना महिना 7 हजार रुपये पेन्शन मिळावी, अशी मागणी देखील करण्यात आली. दरम्यान या सन्मान वारीमध्ये सांगली, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील काही ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून प्रदक्षिणा मार्गावरून घोषणा देत फेरी काढली.
0 Comments