Hot Posts

6/recent/ticker-posts

धरण तर भरलं पण उजनीच्या पाणी नियोजनाचे काय ? पाणी पुजन करणारे हात जलसंधारणासाठी कधी हलणार ? उजनी शिवाय इतर स्त्रोतांच्या विकासाची जिल्ह्याला गरज

धरण तर भरलं पण उजनीच्या पाणी नियोजनाचे काय ?
पाणी पुजन करणारे हात जलसंधारणासाठी कधी हलणार ? 
उजनी शिवाय इतर स्त्रोतांच्या विकासाची जिल्ह्याला गरज

मोहोळ (साहील शेख)(कटूसत्य. वृत्त.): समाधानकारक झालेला पाऊस आणि नंतर त्यात भर म्हणून आलेला वादळी पाऊस यामुळे शेकडो टीएमसी पाणी सोडून देऊन उजनी धरण या वर्षी म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी संपूर्ण क्षमतेने भरले. उजनी धरण भरताना जितका डोळा तीन जिल्ह्यांचा पाणीसाठ्याकडे असतो तितकीशी दक्षता उजनीतून पाणी दरवर्षी सोडताना घेतली जात नाही. त्यामुळे पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन होणे गरजेचे आहे.

दरवर्षी सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली भीमा नदीच्या पात्रातून कित्येक टीएमसी पाणी सोडले जाते. हे पाणी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात साखळी बंधाऱ्यांचे अडथळे, वाळूमुळे पडणारे खड्डे, पार करत औज बंधारा सोलापूरला पोहोच होते. मात्र जितके पाणी सोलापूर शहरासाठी सोडले जाते त्याच्या कित्येक पट कमी पाणी हे शहरवासीयांना वापरासाठी मिळते. त्यामुळे या पाण्याची नदीपात्रात वारमाप गळती जास्त होते हे कुणीही नाकारू शकत नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी सोलापुर शहरासाठी पाणी भीमा नदीतून पाणी न सोडता ते  पाईप लाईन द्वारे शहरासाठी आणले जावे यासाठी प्रशासकीय प्रयत्न सुरू केला होता. मात्र ही बाब भीमा नदीवरील बड्या बागायतदार नेत्यांना पसंत नसल्यामुळे पाणी नदीद्वारेच आणण्याचा कायमस्वरूपी घाट त्या राजकीय नेत्यांनी ताकदीच्या माध्यमातून घातला.वास्तविक पाहता सोलापुरसाठी भीमा नदीतून पाणी सोडण्या ऐवजी सदरचे पाणी डाव्या कालव्याद्वारे भीमा नदीत सोडल्यास कमीत कमी वेळेत व कमीत कमी पाणी पाण्यात बंधारा पूर्ण क्षमतेने भरू शकतो ही बाब प्रशासनाच्या ध्यानात कधी  येणार.

सोलापूरला पाणी भीमा नदीनेच का ? कालव्याद्वारे का नाही ?  असा सवाल व्यक्त होत असताना भीमा नदीमध्ये सोलापूर शहरासाठी या गोंडस नावाखाली पाणी सोडले जाते. केवळ भीमा काठचे धनदांडगे राजकीय बागायतदार सांभाळण्यासाठीच कालव्याद्वारे पाणी जात असताना भीमा नदी द्वारे पाणी सोडून पाण्याची उधळपट्टी होत आहे. दरवर्षी उजनीच्या पाण्याचा वापर ज्या त्या पक्षाचे नेते मंडळी आपापली वोट बँक टिकवण्यासाठी करतात हे निश्चितपणे सोलापूर जिल्ह्यातील लोकशाहीचे दुर्दैवच म्हणावे लागेल. दरवेळी सारखे  या वर्षीही वारेमाप पाणी सोडल्यामुळे लवकर पाणी पातळी खालावु शकते .दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी सोडून देण्याचा जुगार जलसंपदा प्रशासन धाडसाने खेळते जर पाऊस लाबंला अन दुष्काळ पडला तर मात्र प्रशासनाला पळता भुई थोडी होईल. दरवर्षी उजनी धरणातील पाणी संपल्यानंतर  वेळेवर पाऊस सुरू होतो. मात्र जर एखाद्या वर्षी पाऊस काहीच पडला नाही तर मात्र जिल्ह्याची तहान भागवणार्‍या उजनी ऐवजी जिल्ह्याला कुठून पाणी मिळणार याची भ्रांत ना कोणत्या मंत्र्यांना ना कोणत्या नेत्यांना हे तितकंच खरंय.

दरवर्षी उजनी पाणी पूजा करणारे जलसंधारणाच्या कामापासुन कोसो दुर असतात.हजीर तो वजीर या म्हणीप्रमाणे काही नेतेमंडळी जास्तीत जास्त पाणी आपल्या भागात कसे  जाईल यासाठी विशेष अट्हास करताना दिसतात .दरवर्षी अशाच प्रकारे पाण्याची उधळपट्टी झाली तर शेती क्षेत्र तर सोडा मात्र पिण्याचे पाणी देखील उपलब्ध होणार नाही यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे यावर्षी ज्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिक उजनी धरण कधी भरेल याची काळजी करतात त्याच प्रमाणे उजनी धरण भरल्यानंतर त्या पाण्याची शिस्तबद्ध वाटप नियोजन कशी होईल याचीही काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे . दरवर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाण्याची पूजा करण्यासाठी चटावलेले हात कधीही स्वखर्चातुन जलसंधारणाच्या कामाचे उदघाटन करताना दिसत नाहीत. त्यामुळे आयते  साठलेले पाणी लाटणाऱ्या सोलापूर जिल्ह्याने पाणी साठवायची जबाबदारी कधीतरी स्वीकारावी अशी सर्वांचीच भावना आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments