नववर्षाचा आनंद साजरा करताना इतरांच्या जीवनाचा आनंद हिरावून घेऊ नका - पोलीस निरीक्षक आशोक सायकर यांचे आवाहन

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत सुरक्षितपणे करा
मोहोळ (साहिल शेख):- नवीन वर्षाचे आनंदात स्वागत करताना जीवनात अशी एखादी आदर्शवत गोष्ट करा की त्याचा आनंद आपणास आयुष्यभर निश्चितपणे आठवणीत राहील. मात्र हल्ली नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत बीभत्स पद्धतीने करताना सायलेन्सर पुंगळ्या काढून महामार्गावरून फिरणे. दारू पिऊन नशेत वाहन चालवणे. अशामुळे गंभीर अपघात घडतात. त्यामुळे आपला आनंद साजरा करण्याच्या अतिउत्साहाच्या भरात आपण दुसऱ्या निष्पापाच्याही जीवनाचा आनंद हिरावून घेऊ शकतो. अशा अपघातामुळे दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेकांचे बळी महामार्गावर गेले आहेत. त्यामुळे किमान यंदाच्या नववर्षाच्या स्वागता प्रसंगी तरी सर्व स्तरातील नागरिकांनी सजग भावनेने नवीन वर्ष सावधानतेने ते साजरे करावे. ज्याप्रमाणे नवीन वर्षाच्या स्वागताचा प्रसंगी सर्वांना सुरक्षितता देणे जसे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्या प्रमाणे नवीन वर्षाचे स्वागत गर्दी न करता घरातच राहून साध्या पद्धतीने करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. प्रबोधनात्मक आवाहन मोहोळ पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी दैनिक कटुसत्य शी बोलताना केले.
यावेळी कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून दि.31 डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून मास्क सॅनिटायझर याचा वापर करावा असेही यावेळी पोलीस निरीक्षक अशोक सायकर म्हणाले.
यावेळी सायकर म्हणाले की नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक दुचाकी धारक नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी विविध ढाबे हॉटेलवर येतात. यावेळी अत्यंत वेगाने वाहने चालवली जातात. तर कधीकधी रस्त्यावरच फटाके फोडले जातात. याचा त्रास रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांनाही होतो. कधीकधी दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एखादी बस किंवा इतर जड वाहन रस्त्याच्या खाली जाऊन अथवा इतर वाहनावर आदळून जीवघेणे अपघात घडले आहेत. त्यामुळे अशा अपघाताच्या घटना टाळण्यासाठी वाहतूक शाखा सज्ज आहे.
वास्तविक पाहता या कायद्याची अंमलबजावणी करताना आणि शिस्त लावताना कोणालाही दुखावणे किंवा कोणावर हेतुपूर्वक कारवाई करणे हा पोलीस प्रशासनाचा हेतू मुळीच नसतो. मात्र एखाद्याच्या आयुष्यात एखादा दुःखद प्रसंग येऊ नये दुःखद घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन हे सजग आणि दक्ष असते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई ही नागरिकांच्या सर्वदूर हितासाठीच असते हे देखील कारवाई झालेल्यांनी सकारात्मक भावनेने ध्यानात घ्यावे असे आवाहन देखील यावेळी आशोक सायकर यांनी केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशितोष चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक इंगळे, गोपनीय शाखेचे निलेश देशमुख, विजयकुमार माने, शरद ढावरे, गणेश दळवे, वाहतूक शाखेचे संजय जाधव, विठठ्ल पठाडे इत्यादी सह मोहोळ पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
रस्त्यावर वाहने चालविणाऱ्या मद्यपींची ब्रेथ ॲनालायझर मशिनने तपासणीही केली जाणार असून, मद्यपान केलेले असल्यास दंडही ठोठावला जाणार आहे. तसेच, पार्ट्यांमध्ये वा रस्त्यावर थांबुन मद्याच्या नशेत छेडछाडीचे प्रकार वा हाणामाऱ्यांच्या घटना घडण्याची शक्यता गृहित धरून साध्या वेशातील पोलिसांचाही बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.मद्यपान करून वाहने चालविणे गुन्हा आहे. नववर्षाचे स्वागत आनंदाने करा पण अपघात टाळणे गरजेचे आहे. मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
मद्यपान करून गाडी चालवताना सापडेल त्याच्यावर मोटार वाहन कायदा 185 नुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित तळीरामांचा वाहन परवाना रद्द केला जाऊ शकतो अथवा दंडात्मक कारवाई अन्यथा दोन्ही कारवाया केल्या जातील . सर्वांनी सुरक्षितपणे आनंद साजरा करावा यासाठी मोहोळ पोलीस प्रशासन दक्ष राहणार आहे. या कारवाई दरम्यान कोणताही हस्तक्षेप प्रशासन खपवून घेणार नाही. पोलीस हे तुम्हा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस दक्ष आहेत. त्यामुळे प्रशासनावरचा ताण कमी करण्यासाठी नववर्षाचे स्वागत सावध आणि सुखरूपपणे आनंदात करा. - आशोक सायकर (पोलीस निरिक्षक)
0 Comments