Hot Posts

6/recent/ticker-posts

संक्रातीनंतर होणारी निवडणूक भावी सरपंचांचेच काढणार दिवाळे

संक्रातीनंतर होणारी निवडणूक भावी सरपंचांचेच काढणार दिवाळे
काही गावात तर विरोधी पक्ष भुईसपाट 
बॅनर व झेंड्यापेक्षा सोशल मीडियावरच प्रचाराचा फेस

मोहोळ (साहील शेख)(कटूसत्य. वृत्त.): दोनच दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल अखेर वाजलं. भाजप असो अथवा महा विकासआघाडी असो ती होणार की नाही याबद्दल सर्वपक्षीय समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र वर्षातील मोठा सण म्हणून ओळखला जाणाऱ्या मकर संक्रात सणानंतर हि निवडणूक आल्यामुळे निवडणुकीचा वारेमाप खर्च करता करता भावी सरपंचांवर मात्र चांगलीच संक्रात कोसळणार आहे. मात्र यावेळी प्रमुख चार पक्षात म्हणजे शिवसेना भाजप राष्ट्रवादी व काँग्रेस यामध्ये महाविकास आघाडी झाल्यास चार ऐवजी दोनच उमेदवार उभे राहिल्याने कार्यकर्त्यांना मात्र अलभ्य लाभ मिळणार नसल्याने ऐन संक्रांतीत मात्र शिमगा करण्याची वेळ येणार आहे. 

मात्र या निवडणुकीच्या संधीचं सोनं करण्यासाठी सालाबादप्रमाणे याही वेळी काही अतिहुशार समर्थकांनी आताच गळ्यात ठराविक पक्षाचा टॉवेल व डोक्यावर टोपी घालुन गावागावात वातावरण निर्मिती करण्यास प्रारंभ केला आहे. विशेष अश्चर्यजनक बाब म्हणजे सरपंच पदाचे आरक्षण हे चक्क निवडणुकीनंतर होणार असल्यामुळे इर्षा निवडणुकीत कोणी कोणा विरोधात कोणत्या पदासाठी करायची हेच समजेनासे झाले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की विजय कोणाचाही होऊन गुलाल कोणाच्याही अंगावर पडू दया. मात्र अशा वेळी संधीसाधू कार्यकर्त्यांची मात्र  निवडणुकांमध्ये चांगलीच चलती असते. सकाळी चहा एका पक्षाचा दुपारचं जेवण दुसऱ्याच पक्षाचं सायंकाळचा चहा पुन्हा तिसऱ्याच पक्षाचा आणि रात्री उशिरा मांसाहारी जेवण चौथ्याच  पक्षाने खाते लावलेल्या ढाब्यावर करण्याचा यांचा बेत जणू ठरलेलाच.

सध्या गावागावात आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही प्रमुख पक्षाचे आम्ही अनु पक्षाचे अशा कंडया पिकवणे सुरू झाले आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या डीपी ची ठेवून बसण्यापासून एखाद्याच्या घरचं दळून आणून देण्यापर्यंतची कामे कार्यकर्त्यांनी चालू केली आहेत.

या निवडणुकीत सर्वात जास्त गाजणारा मुद्दा जर कोणता असेल तर तो आहे रस्त्याचा. कारण मोहोळ विधानसभा मतदारसंघातील चारही दिशेला जाणार रस्ते खड्डेमय झाल्याने सामान्य नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागत आहेत . दर वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग असो हे दोन्ही विभाग ठराविक टक्केवारीची खिरापत आपापसात वाटून घेऊन नेतेमंडळीच्या मर्जीतील ठेकेदारांना ऑनलाइन मध्ये गोलमाल घडवुन कामे देतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर विजयी झालेले गाव कारभारी चक्क ठेकेदार होऊन मालामाल होतात आणि पुढील निवडणुकीत ज्या पक्षातून निवडून आलो त्याच पक्षाला चॅलेंज करतात ही एक वेगळीच पक्षीय  करामत म्हणावी लागेल.

त्यामुळे तीन महिन्यात आलेले खड्डे सहा महिन्यानंतर पुन्हा जैसे थे होतात .तर खड्डे नाही पुन्हा पडले तर आपला प्रपंच कसा चालायचा या धोरणाने ठेकेदार निकृष्ट दर्जाची कामे करून मोहोळ तालुक्यातील जनतेला आजवर चुना लावत  आले आहेत. याबद्दल तालुक्यातील विविध पक्षातील दिग्गज नेत्यांनी कधीही आवाज उठवला नाही. हे मतदारसंघातील जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल. भाजपच्या सत्ता कालावधीत खड्डा दाखवा व एक लाख रुपये मिळवा असे म्हणणाऱ्या त्यावेळच्या बांधकाम मंत्र्यांनी मतदारसंघातील किती रस्त्यांना किती तोकडा निधी दिला याचा हिशोब त्यांच्याच  मतदारांना या निवडणुकीत द्यावा. काही बडया पक्षातील कार्यकर्त्यांनी आपापल्या सत्तेच्या काळात वाढदिवसाचे बॅनर लावून घेतले. पुन्हा हेच कार्यकर्ते त्याच त्रामीण भागातील खड्ड्यातून आपल्या पक्षाच्या जीवावर घेतलेल्या आलिशान गाड्या आदळत जाताना दिसतात. त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदार संघाची खरी जर वाट कोणी लावली असेल तर दलबदलू आणि संधीसाधू कार्यकर्त्यांनीच. आता हेच दलबदलू आणि संधीसाधू कार्यकर्ते आता या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नवा वरकमाईचा फंडा घेऊन चमकोगिरीच्या रिंगणात उतरले आहेत.

आजच्या काळात निष्ठेचा वावर पुरता संपला असून आता संधिसाधुपणाचा नवा फंडा उदयास येत आहे. तू अमुक आमक्या पक्षाच्या कार्यक्रमाला का गेला. तू अमुक आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत का फिरला. त्या पक्षातून तुझे कुटुंबीय कसे उभा राहिले असे म्हणत कार्यकर्त्याला शिक्षा देणारे नेतेच जेव्हा आपला पक्ष रातोरात बदलतात .तेव्हा अशा नेत्यांना प्रामाणिक कार्यकर्त्यांनी कसा जाब विचारायचा ? हा निश्चितपणे मनाला भेडसावणारा प्रश्न आहे.

मोहोळ तालुक्यातील काही तीन अक्षरी नावाच्या मोठ्या गावातील राजकीय स्थिती काहीशी चमत्कारिकच आहे. ज्या गावात वर्षानुवर्ष ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यातील असताना त्या गावात गेल्या विधानसभेला धनुष्यबान मोठ्या प्रमाणात चालवत स्थानिक निष्ठावंतांनी शिवसेनेला मोठे मतदान दिले . तेच नेते आणि त्यांचे समर्थक आज राष्ट्रवादीच्या विविध महत्त्वाच्या पदावर राहून वरिष्ठ नेत्यांच्या जवळ जाऊन मी किती निष्ठावंत आहे असा आव आणतात. विशेष म्हणजे स्वतःच्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील मत स्वतःच्या पॅनलला पोल करून घेणारे गाव पुढारी विधानसभेला मात्र भलत्याच पक्षाच्या दावणीला जाऊन प्रचार खर्चाची वैरण खातात हा दैवदुर्विलास म्हणावा लागेल.वर्षानुवर्ष श्रेष्ठींजवळ असणाऱ्या या चमकोगीरी समर्थकांच्या मागे त्यांच्या त्यांच्या गावात किती मतदान आहे हे त्या नेत्यांनीही कधी तर खाजगीत तपासून पहावे. 

Reactions

Post a Comment

0 Comments