राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सांगोला तालुक्यात भोंगळा कारभार -नगरसेवक सुरज बनसोडे
पोलिस प्रशासनाची कामगिरी मस्त,राज्य उत्पादन विभागाचे अधिकारी मात्र सुस्त
सोलापूर (क.वृ):- सांगोला शहर आणि तालुक्यात अवैध दारू विक्री आणि दारूचे गुत्ते खुलेआम सुरू आहेत. या खुलेआम दारू विक्रीवर आणि या व्यवसायावर नियंत्रण ठेवणारा विभाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभाग काम पाहत आहे. पण सांगोला शहर आणि तालुक्यातील बहुतांश गावात,धाब्यावर खुलेआम अवैध मद्यविक्री केली जात आहे. अवैध दारूविक्री मुळे शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडत आहे.याच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कानाडोळा करीत आहेत, तर ऑनड्युटी असणाऱ्या पोलिस प्रशासनाची कामगिरी मात्र मस्त असल्याची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे, राज्य उत्पादन विभागाचे अधिकारी मात्र सुस्त असल्याचे सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांतून बोलले जात आहे, एकंदरीतच या विभागावर सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना नाराज असून आंदोलनाच्या तयारीत असल्याचे ही ऐकावयास मिळत आहे,अशा या विभागाच्या भोंगळ कारभारावर तगडा नगरसेवक सूरज बनसोडे यांनी हल्लाबोल केला आहे.या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.
या विभागातील तक्रार कुठे करायची ?अधिकाऱ्यांशी संपर्क कुठे करायचा ? काही लोक प्रतिनिधीनी या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता,त्यांचा भ्रमणध्वनी बंद असतो,अशा अनेक अडचणी या विभागाच्या बाबतीत असून सर्व सामान्य नागरिक आणि सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मात्र हतबल झाले आहेत.
सांगोला तालुक्यात कार्यरत असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उप विभागाचे चिंचोली रोडवर असणारे कार्यालय तेथून हलवले आहे,पण नवीन कार्यालयाचा पत्ता ही संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुणाला दिला नाही. संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मात्र डोळ्याला पट्टी बांधून शांत आहेत,अवैध दारू विक्री बंद करून तालुक्यात शांतता राखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्य करावे,अशी मागणी सामान्य जनतेतून केली जात आहे. त्यामुळे अशा कार्यकर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून डॅशिंग अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून केली जात आहे.
ऐन लॉक डाऊन आणि नंतरच्या कालावधीत सांगोला तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था उत्कृष्ठपणे ठेवण्याचे कार्य पोलीस निरीक्षक राजेश गवळी आणि त्यांची टीम बजावीत आहे.ऐन विधानपरिषद निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी मद्यविक्रीचे आदेश काढले असताना सांगोला शहर आणि तालुक्यातील अनेक मद्यविक्री व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली,या कालावधीत निष्काळजी,कामचुकार, अधिकाऱ्यांच्या वरद हस्तामुळे हे व्यावसायिक निगरगठ्ठ झाल्याचे पहावयास मिळाले,येणाऱ्या काही दिवसांत तरी शहर आणि तालुक्यातील मद्यविक्री करणारे बेकायदेशीर गुत्ते पूर्णपणे बंद ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देवून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
सांगोला तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था उत्कृष्ठपणे ठेवण्याचे कार्य पोलीस निरीक्षक राजेश गवळी आणि त्यांची टीम बजावीत असताना, अवैध दारू विक्रीवर बंदी घालण्याचे कार्य राज्य उत्पादन शुल्क विभागाचे असताना हा उपविभाग मात्र कोमात असल्याचे दिसून येत आहे. सांगोला पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यावर अनेक ठिकाणी धाडी टाकून गुन्हे दाखल केले आहेत. मात्र राज्य उत्पादन विभागाला पोलिसांच्या या कामगिरीचे सोयर सुतक नसल्याचे दिसून येत आहे.राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र "'तेरी भी चूप मेरी भी चूप" या भूमिकेत आहे. सांगोला पोलीस ज्या पध्दतीने कारवाई करतात,त्या पद्धतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करावी,अशी मागणी सामान्य नागरिकांतून केली जात आहे.
या वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे परांडकर यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी 9112951313 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता,त्यांचा फोन बंद लागला.
0 Comments