Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ शिवसेना-शेटफळ भाजपमधील अंतर्गत विरोधाला राष्ट्रवादीची फोडणी

मोहोळ शिवसेना-शेटफळ भाजपमधील अंतर्गत विरोधाला राष्ट्रवादीची फोडणी
राष्ट्रवादीला सक्षम विरोधक नसला तरी विरोध मात्र कायम


          मोहोळ (साहील शेख):- विधानसभेच्या विजयानंतरच्या भाषणात राजन पाटील यांनी  विजयाला अप्रत्यक्षपणे हातभार  लावणाऱ्यांचेही जाहीर आभार व्यक्त केले. याची मोठी सल जितकी भाजपला आहे त्यापेक्षाही कैक पटीने शिवसेनेच्या मनात आहे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले असले तरी मोहोळ मतदारसंघात मात्र गेल्या अनेक महिन्यापासून शिवसेना-राष्ट्रवादी कुठेही एकत्र आल्याची बाब सध्या तरी जाणवत नाही.

          सध्या राष्ट्रवादी व शिवसेनेच्या वाट्याला आलेली मंत्रिपदे पाहता येत्या काळातही सत्ताकारणावर कोणाचा प्रभाव असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.राज्याच्या राजकारणात जरी सेना राष्ट्रवादीची दोस्ती झाली असली तरी मोहोळ मतदारसंघातील शिवसेना राष्ट्रवादीची कुस्ती येत्या काळातही मिटेल असे जाणवत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी इतके चाणाक्ष पक्ष आहेत की ते त्यांच्या दोघाच्या सत्ता सामर्थ्यमध्ये तिसऱ्याला सहजा सहजी येऊ देत नाहीत.

          गेल्या चार वर्षापासून मोहोळ तालुक्याच्या राजकारणात निवडणुका जरी सर्वपक्षीय झाल्या असल्या तरी खरी लढाई ही जिल्हा परिषदेतील शेटफळचे डोंगरे आणि पंचायत समितीतील अनगरचे पाटील या दोन गटांमध्ये सुरू होती. या गटांच्या राजकीय हेवेदाव्यात सर्वच पक्षाचे नेते आणि उपनेते मात्र नाहक भरडले जात आहेत. अडीच वर्ष चिठ्ठीद्वारे पंचायत समितीचे सत्ता सभापती आणि उपसभापती पदाच्या माध्यमातून भीमा लोकशक्ती परिवाराने सत्ता घेतली.अडीच वर्षाच्या कालावधीत विकास कामांपेक्षा सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी मासिक बैठकीत भिडले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यामुळे नेहमीप्रमाणे तालुक्याच्या वाट्याला विकासकामां ऐवजी केवळ आणि केवळ गदारोळाची करमणूक आली. अडीच वर्षानंतर पुन्हा बेरजेचे राजकारण करत राजन पाटील यांनी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला. जिल्हा परिषदेत महत्वाची पदे गेल्याच्या खेळीचे उट्टे राष्ट्रवादीने मोहोळ पंचायत समिती सत्ता खेचून घेऊन काढले.

          विधानसभा निवडणुकीत  लोकशक्ती परिवाराने शिवसेनेपासून काहीशी फारकत घेत अपक्ष उमेदवार मनोज शेजवाल यांना पाठिंबा देण्याची अनपेक्षित भूमिका घेतली. ज्यांचा एरवी काहीही राजकारणाशी संबंध नसतो अशा अवास्तव उद्योगी व्यक्तींनी शिवसेना भाजपमधील युती तील समन्वय कोलमडून टाकला. याचा फायदा राष्ट्रवादीलाच झाला. याबाबत मोठे राजकीय खलबते होऊन थेट राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात स्थानिक भाजपाने गुजगोष्टी करत पुनश्च डोंगरे यांना भाजप -शिवसेनेच्या गोटात वळविण्यात यश मिळवले. तोपर्यंत राष्ट्रवादीने प्रचारामध्ये पद्धतशीर संभ्रमावस्था पसरविण्यात यश मिळवले.

भाजप-शिवसेनेच्या विरोधाला राष्ट्रवादीची फोडणी..

          नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना सोबत राष्ट्रवादी राहणार का ? मधील बहुतांश प्रमुख नेत्यांना राष्ट्रवादी बद्दल प्रचंड विरोधाची भावना आहे. ज्यांना पाटील यांनी राजकारणाचे धडे शिकवले तेच आता राष्ट्रवादीला धडा शिकवण्याची भूमिका अधूनमधून घेतात. राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांनी आणलेल्या निधीवर राजकीय विकास प्रपंच करणारे देखील आजकाल त्यांना शह देण्याची भाषा करतात.राजन पाटील यांच्यासारख्या मुत्सद्दी नेत्यांनी भाजप शिवसेना आणि काँग्रेसमधील बऱ्याच हेवीवेट समजणाऱ्या अनेक नेत्यांचे पॉलिटिकल व्होल्टेज कमी करून त्यांना घरी बसवले आहे.

          तर अनगर राष्ट्रवादी विरोधात प्रत्येक निवडणुकीत रणशिंग फुंकणारे भीमा व लोकशक्ती परिवार सध्या भाजपमध्ये आहे. त्यामुळे जरी ठाकरे -पवार एकत्र आले असले तरी मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये येत्या काळातही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आणि विरोधासाठी विरोध म्हणून सोबत शिवसेना असाच कलगीतुरा निश्चितपणे रंगण्याची शक्यता आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments