Hot Posts

6/recent/ticker-posts

लक्ष्मीनगर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची ग्रामस्थांतून होतेय मागणी

लक्ष्मीनगर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची ग्रामस्थांतून होतेय मागणी

गावपुढ्याऱ्यांना मात्र पाहिजेत सत्तेच्या चाव्या

सांगोला (जगन्नाथ साठे)(कटूसत्य. वृत्त.): सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी गावातील सुजाण, सुशिक्षित नागरिकांतून होत आहे. गावपुढारी मात्र सत्तेच्या खुर्चीच्या चाव्या आपल्याच हाती कशा राहतील, याकडे लक्ष देत आहेत. येत्या दोन दिवसानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने गावातील अनेक ज्येष्ठ आणि गावविकासाचे आदर्श स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना मात्र ही निवडणूक गावपातळीवर आपसात मिटवून घेवून तालुक्यात नवा आदर्श निर्माण करावा, असे वाटते. याकडे गावपुढारी नेमकी काय भूमिका घेणार, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

"गाव तसे चांगले पण राजकारणाने वेशीला टांगले" अशी अवस्था गावची झालेली दिसून येत आहे. जवळपास तीन हजारापेक्षा जास्त लोक संख्या असलेल्या गावात 2300 च्या आसपास मतदार आहेत.गावातील अनेक तरुण पोलीस,जवान, बँकिंग,आयकर,शिक्षक,पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्या सर्वांनी आपल्या कार्यकर्तव्यातून गावाचा वेगळा ठसा उमटविला आहे.भुईमूग शेंगासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष्मीनगर ची वेगळी ओळख आहे. दुष्काळाच्या झळा अगोदरच सोसलेल्या या गावाची आर्थिक स्थिती मध्यतरी च्या पावसाने आणि राजेवाडी तलावाच्या आवर्तनाने सुधारली आहे.ऊसतोड मजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. शिक्षण, सहकार, शेती, उद्योगधंदा,व्यापार आदि क्षेत्रात गाव विकासाची कात टाकली आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमुळे पुन्हा एकदा गावपातळीवरील पूर्ववैमनस्य उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय गावात वाढत असणारी व्यसनाधीनता कमी करण्यासाठी बिनविरोध करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. या पूर्वी झालेली भांडणे राजकीय कारणास्तव झालेली आहेत. त्यामुळे गावात शांतता, सुव्यवस्था, ऐक्यता,बंधुता,समता,प्रस्तापित करायची असेल तर ही निवडणूक सर्वांनी सामोपचाराने मिटवून बिनविरोध करावी,अशी मागणी दबक्या आवाजात चर्चिली जात आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार शहाजी बापू पाटील,माजी आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार दिपक साळुंखे पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,भाजपा नेत्या राजश्रीताई नागणे पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. मुळातच स्थानिक पातळीवर विचार करून तुम्हीच निवडणूक लढविण्याचा विचार करा,असा सल्ला सर्वच नेतेमंडळींनी आपापल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.गावाच्या विकासासाठी जे हवे ते मागा, ते आम्ही पुरवू असेही या नेतेमंडळीं सांगितले आहे. मात्र गावपुढारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्रामदैवत लक्ष्मी देवीच्या पावन भूमीने नावारूपाला आलेल्या लक्ष्मीनगर मध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी आणि मतांचा घोडेबाजार थांबविण्यासाठी गाव पुढाऱ्यांनी निवडणुकीचा तिढा सोडवुन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments