जवळा विकास सेवा सोसायटीचा कारभार आदर्शवत : ना.बाळासाहेब पाटील

सांगोला (कटूसत्य. वृत्त.): सलग 20 वर्षांपासून सोसायटीची कर्जवसुली 100% टक्के करून शेतीकर्ज बरोबरच सभासदांना सोनेतारण कर्ज योजना, लॉकर योजना, अल्पबचत जमा करणारी योजना, यांसह आसपासच्या 5 महसुली गावात पोहोचून सभासदांच्या हितार्थ अनेक वर्षांपासून सक्रिय असणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था जवळा संस्थेचा कारभार आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काढले. गावच्या सोसायटीचे चेअरमन विजयकुमार देशमुख व सचिव हेमंत कुलकर्णी यांच्या कार्याचे ना.बाळासाहेब पाटील यांनी कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली.
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे नेते मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवळा गावच्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेने गावाच्या व परिसराच्या विकासात अनन्यसाधारण योगदान दिले आहे. शेती कर्जाबरोबरच इतर सेवा सुविधा पुरवणारी व 100% वसुली असणारी महाराष्ट्र राज्यातील वि.का.स.सेवा सोसायटी जवळा ही एकमेव संस्था आहे. आगामी काळात शेती उपयोगी व्यवसाय व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातर्फे अर्थसहाय्य घेऊन सभासद शेतकऱ्यांना शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्याकरिता वेअर हाऊस व धान्य खरेदी केंद्र व्यवस्था सुरू करण्याचे सोसायटीच्या वतीने नियोजित आहे याबाबत शासकीय पातळीवरून लागेल ती मदत करण्याची तयारी ना.बाळासाहेब पाटील यांनी दर्शवली.
0 Comments