शेतकऱ्यांची गटफोड म्हणजे ८५ प्रकरणे वेळेत होण्यासाठी आमदार यशवंत माने यांचा आदर्शवत उपक्रम

दर शुक्रवारी कागदपत्रे संकलित करून स्वतः करणार पाठपुरावा
मोहोळ (कटूसत्य. वृत्त.):- मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आ. यशवंत माने हे नेहमीच विकासाबाबत दक्ष आणि प्रशासकीय स्तरावर कर्तव्यकठोर आमदार म्हणून जिल्ह्यात सर्वांनाच परिचित आहेत. त्यांनी आपल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात एक आगळावेगळा आणि अनोखा उपक्रम राबवला आहे. त्यांच्या या आदर्शवत उपक्रमामुळे जमिनीच्या सात बाराची गटफोड करून तशी नोंद धरण्यासाठी तहसील दरबारी,मंडलाधिकारी आणि तलाठी कार्यालयात हेलपाटे मारणाऱ्या सातबारा धारक शेतकऱ्यांना आणि मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे खातेफोड वाटप आणि नोंद धरण्याची प्रशासकीय प्रक्रिया निशुल्क करून घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी मोहोळच्या विश्रामगृहावर दर शुक्रवारी आमदार यशवंत माने यांना समक्ष भेटून सर्व कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन त्यांनी विविध माध्यमांद्वारे सातबाराधारक सर्व शेतकरी बांधवांना केले आहे. शुक्रवारपासून या अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ मोहोळ मतदार संघाचे मार्गदर्शक तथा माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. यशवंत माने यांच्या उपस्थितीत मोहोळ विश्रामगृहावर होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दर शुक्रवारी मोहोळ येथील विश्रामगृहावर आमदार यशवंत माने हे मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन व विकासात्मक आढाव्याच्या बैठका घेत असतात. महिन्याकाठी जवळपास पाच ते सहा जण जमिनीच्या गटफोड आणि वारसनोंदीच्या प्रक्रियेला विलंब असल्याची कैफियत घेऊन येत असत. बऱ्याच जणांचे गटफोड, वाटप वेळेत न झाल्यामुळे बँक प्रकरणे, पिककर्ज त्याचबरोबर शेतातील घर बांधकाम परवान्याला देखील अडचणी निर्माण होत असत. वास्तविक पाहता ही प्रक्रिया शासनस्तरावरून अत्यंत सुटसुटीत होऊन योग्य ते आदेश विभागीय स्तरावरून प्रत्येक तालुक्याला आले असतानाही काही विशिष्ट हेतुने अनेक मंडल अधिकारी आणि तलाठी शेतकऱ्यांची जाणून-बुजून अडवणूक करत असल्याची बाब आमदार माने यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे हे गटफोड आणि वाटप प्रकरण म्हणजेच 85 करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपाआपली कागदपत्रे विश्रामगृहावर आणून माझ्याकडे द्यावीत. असे आवाहन आ. माने यांनी केले आहे. आ. माने यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे वेळेत गटफोड आणि नोंदीचा शेतकऱ्यांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे या आदर्शवत उपक्रमाचे शेतकरी बांधवातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.आजपासून या महत्त्वाच्या उपक्रमासाठी शेतकरी बांधवांची सर्व कागदपत्रे आमदार यशवंत माने यांच्याकडे संकलित केली जाणार असून स्वतः आमदार यशवंत माने या प्रकरणांचा पाठपुरावा करून महसूल स्तरावरून त्या नोंदी वेळेत होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीत राष्ट्रवादीचा वाटा सिंहाचा ठरला आहे. राष्ट्रवादीची स्थापनाच मुळात संस्थापक तथा आमचे मार्गदर्शक नेते शरदच्चंद्र पवार यांनी शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवुन केली आहे. तासाभरात बैठक काही मिनिटात निर्णय आणि सेकंदात अंमलबजावणी हीच आमच्या राष्ट्रवादीच्या गतिमान विकासाची घडयाळ निशाणी आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागू नये शिवाय त्यांचा वेळ आणि त्रास वाचवण्यासाठी आम्ही हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा फायदा घेऊन कागदपत्रे संकलित करून आपापले गटफोड करून घ्यावी. कागदपत्रे काढण्यासाठी शेतकरी बांधवांना काही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा. - आ. यशवंत माने मोहोळ विधानसभा मतदारसंघ.
0 Comments