पंढरपुरात युवकाने साकारला अप्रतिम किल्ला

पंढरपूर (क.वृ.):- पंढरपूर शहरातील श्रीहरी चकोर बावीस्कर या युवकाने दिवाळीनिमित्त आपल्या घराच्या अंगणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे किल्ला बांधला असून लोहगड, रायगड, प्रतापगड व राजगड या सर्व किल्ल्यातील एक एक वैशिष्ट्य या किल्ल्यामध्ये तयार केलेले आहे, त्यामुळे हा किल्ला अतिशय अप्रतिम असा बनविलेला आहे व त्यानंतर यामध्ये किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा ठेवलेला असून त्यांचे मावळे व किल्ल्यावर असणारे विविध काम करणारे कर्मचारी यांची हुबेहूब मांडणी या किल्ल्याच्या माध्यमातून केलेली आहे.
दिवाळी म्हटलं की लहान मुल किल्ला बनवत असतात व आपआपली कलाकृती या माध्यमातून इतरांसमोर आणत असतात. अशीच एक कला आहे ती पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.चकोर बावीस्कर यांचा मुलगा श्रीहरी याच्यामध्ये. दिवाळीनिमित्त वेगळ्या पध्दतीचा किल्ला श्रीहरीने बनविला असून विशेष म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पितळी तोफा या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. सदरचा किल्ला बनविण्यासाठी श्रीहरीचा मित्र तन्मय राजेश दंडे याने ही मदत केली असल्याचे त्याने सांगितले. अनेक किल्ल्यातील एक एक वैशिष्ट असणारा किल्ला पंढरपुरात साकारल्यामुळे अनेकांतून श्रीहरी बावीस्कर याचे कौतुक केले जात आहे.
0 Comments