किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश :
प्रभाग २२ मधील अतिवृष्टीग्रस्तांना मिळाली तात्काळ शासकीय मदत
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर शहरात अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक २२ मधील गैबी पीर नगर, धोंडीबा वस्ती, रामवाडी, इरण्णा वस्ती, यतिमखाना परिसर आदी भागांत मोठे नुकसान झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आले होते. या संकटातून सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांनी तत्काळ पाठपुरावा करत प्रशासनाची झोप उडवली आणि मदतीचा मार्ग मोकळा केला.या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळून, प्रशासनाने त्वरेने पंचनामे पूर्ण केले आणि नुकसानग्रस्त कुटुंबांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी ₹१०,०००/- ची थेट आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे. ही मदत मिळाल्याने अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या यशस्वी मदतकार्याबाबत बोलताना किसन जाधव म्हणाले, प्रभाग २२ मधील नागरिक हे आमच्यासाठी कुटुंबाप्रमाणे आहेत. त्यांच्या अडचणींना प्राधान्य देत आम्ही कायमच तत्पर आहोत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.नगरसेवक नागेश गायकवाड यांनी देखील या संकटकाळात तातडीने प्रतिसाद देत, संबंधित अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहून मदतीचे काम मार्गी लावले. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आमच्या तक्रारीची त्वरेने दखल घेत मदतीसाठी जे झटले, त्यामुळे वेळेवर मदत मिळाली, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.या मदतकार्याबद्दल महायुती सरकारमधील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती यांचे खास आभार देखील यावेळी व्यक्त करण्यात आले.किसन जाधव यांनी शेवटी ठामपणे सांगितले की, “प्रभाग २२ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो अधिक बळकट करण्यासाठी आम्ही उत्कृष्ट सेवा व सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत.” असेही यावेळी जाधव म्हणाले.
0 Comments