Hot Posts

6/recent/ticker-posts

"तुकोबारायांचा आदर्श घ्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा!"

 "तुकोबारायांचा आदर्श घ्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा!"

 देहूत लाक्षणिक उपोषणात सरकारला जागं करण्याचा निर्धार


श्री क्षेत्र देहू (कटूसत्य वृत्त):-शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज श्री क्षेत्र देहू येथे एक लाक्षणिक आणि भावनिक उपोषण पार पडले. वारकरी आघाडीचे प्रमुख ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे यांच्या नेतृत्वाखाली, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या समाधी चरणी नतमस्तक होत सरकारला कर्जमाफीची आठवण करून देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते आणि वारकरी भाविकांनी सरकारने तुकोबारायांचा आदर्श घेऊन शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी ठाम मागणी केली.

तुकोबारायांची आठवण आणि प्रेरणा

संत तुकाराम महाराजांनी सावकारकीच्या वह्या इंद्रायणी नदीत बुडवून शेतकऱ्यांना आर्थिक साखळदंडातून मुक्त केलं होतं. आज त्याच जागी, त्यांच्या समाधी स्थानावर नतमस्तक होत, सरकारलाही शेतकऱ्यांच्या उध्वस्त होत चाललेल्या जीवनावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करण्यात आले.

लक्षणीय उपस्थिती

या लाक्षणिक उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला. उपस्थितांमध्ये हे मान्यवर प्रमुख होते:
प्रशांत दादा जगताप – पुणे शहराध्यक्ष,तुषार कामठे – पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष,देवदत्त निकम – जिल्हा कार्याध्यक्ष,विकास लवांडे,रविकांत वरपे,अनिल बापू पवार, डॉ. सुनील जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी, महिला भगिनी, वारकरी मंडळी आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी

"सरकारने आता तरी जागं व्हावं" – आ. रोहित पवार

आमदार रोहित पवार यांनी या उपोषणास आपला पाठिंबा देत म्हटलं की, “संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा मार्ग दाखवला होता. आजच्या सरकारनेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं, ही आमची मागणी आहे. या लाक्षणिक उपोषणानंतर तरी सरकारने जागं व्हावं.”

"उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मनापासून आभार"

या लाक्षणिक आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व वारकरी, महिला, शेतकरी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार आ. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टद्वारे मानले.

देहूतील या उपोषणात भावनिक भक्ती आणि शेतकऱ्यांच्या हक्कांची लढाई यांचा मिलाफ दिसून आला. सरकारने संत परंपरेचा सन्मान राखत, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांच्या आत्महत्यांना पूर्णविराम द्यावा, हीच या उपोषणाची केंद्रवर्ती मागणी होती.

Reactions

Post a Comment

0 Comments