डॉ. संपदा मुंडे प्रकरण : न्यायासाठी जनतेचा आवाज,
फडणवीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
सोलापूर (कटूसत्य वृत्त) – डॉ. संपदा ताई मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. “डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे, आरोपींना कडक शासन व्हावं,” अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. परंतु नेहमीप्रमाणेच या प्रकरणातही काही दिवस जनआंदोलन, पोस्ट्स आणि मोर्चे होतील, आणि त्यानंतर पुन्हा सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होईल, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.
डॉ. मुंडे यांच्या प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील स्त्रियांवरील अन्याय, शोषण आणि असुरक्षिततेच्या प्रश्नांना अधोरेखित केलं आहे. काही दिवसांपूर्वी देशमुख सरपंच प्रकरण, मुंडे प्रकरण, तसेच पुण्यातील नकुल यासारख्या घटनांनी सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगवली होती. मात्र अशा घटनांच्या पलीकडे, कॅमेऱ्यांच्या आणि मथळ्यांच्या बाहेर दररोज असंख्य अत्याचार घडत आहेत, हे कटू वास्तव सर्वांना ठाऊक असूनही व्यवस्था मात्र ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवरही या पार्श्वभूमीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. “फडणवीस हे आतापर्यंतचे सर्वात अपयशी गृहमंत्री व मुख्यमंत्री आहेत,” अशी टीका अनेक नागरिकांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण, न्यायप्रक्रियेतील विलंब आणि राजकीय हस्तक्षेप या मुद्द्यांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था डळमळीत झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
जनतेची अपेक्षा आहे की या प्रकरणात केवळ सोशल मीडियावरील हळहळ नव्हे, तर न्याय मिळवून देणारी ठोस कृती व्हावी. “सत्ता कायमची नसते, पण न्याय कायमचा असतो,” असा इशारा देत नागरिकांनी राज्य सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

0 Comments