'तू प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो',
राज ठाकरे यांचा रुपाली पाटील यांना मेसेज
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देण्यात आली होती. साताऱ्यातून अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचा आरोप होता. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांना फोन करुन धीर दिला आहे. ‘तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’, असं राज ठाकरे यांनी फोनवर रुपाली पाटील यांना सांगितलं.
रुपाली पाटील पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात उतरल्या आहेत. मनसेकडून त्या निवडणूक लढवत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर अशा भागांना भेटी देऊन पदवीधरांशी संवाद साधून त्या प्रचार करत आहेत. अशातच पाटील यांना फोन करुन एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. रुपाली पाटील यांना आलेल्या धमकीनंतर राज ठाकरे यांनी त्यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली तसंच पाटील यांच्याकडून आतापर्यंतच्या निवडणूक प्रचाराची माहिती घेतली. सरतेशेवटी ‘तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’, असं ठाकरी शैलीत सांगितलं.
राज ठाकरे यांच्या फोननंतर ‘ज्यांच्या डोक्यावर राज ठाकरे यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही. अश्या धमक्यांना मनसे वाले भीक सुद्धा घालत नाही’ , अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली आहे. तसंच धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, धमकीला मी घाबरणारी नाही. विद्यार्थी शिक्षकांच्या अधिकार आणि हक्कांसाठी मी लढत राहीन, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी धमकीनंतर व्यक्त केली आहे.
कोण आहेत रुपाली पाटील ?
पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून रुपाली पाटील यांनी काम पाहिले आहे. सध्या त्या मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांचं विशेष काम आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे. त्या उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण बी.कॉम LLB झाले आहे. त्या व्हॉलीबॉल आणि शुटिंग व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत.

0 Comments