पदवीधर शिक्षक मतदारसंघातील प्रचार बैठकीस सांगोल्यात प्रचंड प्रतिसाद

सांगोला (क.वृ.) : - तालुका प्रतिनिधी पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने जाहीर केलेले अधिकृत उमेदवार क्रांतिकारी विचारांचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व करणारे आहेत, पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण गणपती लाड आणि शिक्षक मतदारसंघातून प्रा जयंत आसगावकर यांचा विजय मात्र औपचारिकता उरली आहे. क्रांतिकारी विचारांचा वारसा जपणाऱ्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील दोन्ही उमेदवारांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलून सोलापूर जिल्हा आपली क्रांतीची परंपरा कायम ठेवणार, असा निर्धार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
सांगोला येथे पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवार दि. 21 रोजी आयोजित बैठकीस मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा प्रबुद्धचंद्र झपके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, लतीफ तांबोळी, सूतगिरणीचे चेअरमन प्रा नानासाहेब लिगाडे, शेकापचे चिटणीस विठ्ठल शिंदे, पंचायत समितीच्या सभापती राणी कोळवले, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती अनील मोटे, जि प सदस्य सचिन देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व पदवीधर शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री ना.भरणे म्हणाले सोलापूर जिल्हा नेहमी क्रांतिकारी विचारांचे नेतृत्व करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. यंदा प्रथमच सुदैवाने क्रांतिकारक विचारांचा वारसा व परंपरा असलेले पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील दोन्ही उमेदवार आपणास लाभले आहेत. अशा क्रांतिकारक विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पदवीधर मतदारसंघातील अरुण गणपती लाड आणि शिक्षक मतदारसंघातील प्रा जयंत दिनकर आसगावकर या दोन्ही उमेदवारांना सोलापूर जिल्ह्यातून निर्णायक मताधिक्य देऊ, असा विश्वासही शेवटी पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, आमदार शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, काँग्रेसचे प्रा झपके, यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना व पदवीधर तसेच शिक्षक मतदारांना आगामी काळात सतर्क राहून जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचा व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सांगोला शहर आणि तालुक्यातून प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन केले.
क्रांतिकारी विचारांना यंदा संधी देणार :
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून जी. डी.बापू अर्थात गणपती लाड यांनी आपले योगदान दिले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव अरुण लाड यांनीही क्रांतिकारी विचारांचा वारसा सक्षमपणे जोपासला. शिवाय शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा.जयंत आसगावकर यांनीही शिक्षक म्हणून आपल्या 31 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत अनेक उल्लेखनीय कामे केली. म्हणून क्रांतिकारी विचारांना यंदा सांगोला तालुका संधी देणार आहे. - गणपतराव देशमुख, ज्येष्ठ नेते शेका
भाजपची डाळ यंदा शिजू देणार नाही :
गेल्या वेळेस झालेल्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ऐनवेळी दुफळी निर्माण झाली. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांच्या जोरावर भाजपचा उमेदवार अवघ्या थोड्या मतांनी जिंकला. मात्र यंदा परिस्थिती उलटी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी भक्कम आहे. शिवाय सोबत यंदा महाविकास आघाडीस शिवसेनेचाही पाठिंबा आहे. म्हणून यंदा पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात कसल्याही परिस्थितीत भाजपाची डाळ शिजू देणार नाही. - दिपकआबा साळुंखे पाटील ,प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
असे उमेदवार मिळणे हे आमचे सुदैवच..!
पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड यांच्या नसानसात देशभक्ती आणि क्रांतिकारी विचार भिनले आहेत. तर शिक्षक मतदारसंघातील जयंत आसगावकर यांनी तब्बल 30 वर्षाहून अधिक काळ अत्यंत साधेपणाने आणि इमानदारीने ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात असे उमेदवार मिळणे हे लोकप्रतिनिधी व मतदार म्हणून आमचे सुदैवच म्हणायला हवे अशा चारित्र्यसंपन्न आणि क्रांतिकारी विचारांच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक जिवाचे रान करतील : - आमदार शहाजीबापू पाटील

0 Comments