विजापूर रोड रेल्वे पुलावरील वाहतूक बंदमुळे होटगी रस्त्यावर तीन किलोमीटरपर्यंत कोंडी
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- विजापूर रस्त्यावरील रेल्वे पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी सोमवारी दुपारी तीननंतर या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आल्याने होटगी रस्ता, आसरा चौक व जुळे सोलापूर परिसरात सुमारे तीन किलोमीटर अंतरावर अडीच ते तीन तास प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.
विजापूर रस्त्यावरील रेल्वे पुलाच्या डागडुजीसाठी सोमवारी व मंगळवारी दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहतूक वळविण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी काम सुरू होताच विजापूर रोड रेल्वे पुलावरील वाहतूक पूर्णपणे थांबवून ती पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली. ही वाहतूक पत्रकार भवन चौक, महावीर चौक, आसरा चौक, डी-मार्ट, जुळे सोलापूर मार्गे विजापूर रोडच्या दिशेने सोडण्यात आली.
सायंकाळी सहाच्या सुमारास शासकीय व खासगी कार्यालये सुटल्याने तसेच विद्यार्थी व नागरिक घरी परतत असतानाच महावीर चौक ते आसरा चौक, जुळे सोलापूर या सुमारे तीन किलोमीटर अंतरावर भीषण वाहतूक कोंडी झाली. वाहनांची रांग लागल्याने वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू होती.
मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला. वाहतूक वळविण्याचा निर्णय दोन-तीन दिवस आधीच घेतला असतानाही प्रत्यक्ष ठिकाणी प्रभावी नियोजन व पुरेसे मनुष्यबळ दिसून आले नाही. परिणामी अनेक वाहनधारकांनी शहर वाहतूक शाखेच्या नियोजनशून्य कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. रात्री आठनंतर विजापूर रोड वाहतुकीस खुला होताच होटगी रस्त्यावरील कोंडी हळूहळू कमी झाली.
दरम्यान, मंगळवारी (उद्या) दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत पुन्हा विजापूर रस्त्यावरील रेल्वे पुलाचे काम होणार असल्याने, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवून योग्य नियोजन करावे व वाहतूक कोंडी होऊ नये, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
चौकट 1 : पोलीस कर्मचारी वाढविणार
विजापूर रस्ता रेल्वे पुलाचे काम सुरू झाल्यानंतर वाहतूक बंद केल्याने होटगी रस्ता, आसरा, जुळे सोलापूर, मोदी, मसिहा चौक, भैय्या चौक व प्राणिसंग्रहालय परिसरात कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सात पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती; मात्र ती संख्या अपुरी ठरली. मंगळवारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल.
रवींद्र भंडारे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
चौकट 2 : आधीच नियोजन अपेक्षित होते
वाहतूक शाखेकडून पुरेसे पूर्वनियोजन झाले नाही. होटगी रस्ता-आसरा पुलावर जवळपास तीन तास ट्रॅफिक जाम होता. सामान्य नागरिकांवर कारवाईसाठी चौकात मोठ्या संख्येने वाहतूक पोलीस असतात; मात्र अशा प्रसंगी ते कुठे जातात, हा प्रश्न आहे.
श्याम कदम, छत्रपती ब्रिगेड
चौकट ३ : गर्दीत रुग्णवाहिका अडकली
वाहतूक बदलामुळे होटगी रस्त्यावर झालेल्या कोंडीत रुग्णवाहिका अडकली. सायरन वाजवत ती संथगतीने पुढे सरकत होती. या कोंडीचा फटका रुग्णालाही बसला.
चौकट 4 : पुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम
विजापूर रस्त्यावरील रेल्वे पुलाच्या खालच्या बाजूचे खराब झालेले बेअरिंग बदलण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. पुलाच्या एका बाजूचे काम सोमवारी पूर्ण झाले असून मंगळवारी दुसऱ्या बाजूचे काम पूर्ण होणार आहे.
.png)
0 Comments