नानांना भावपूर्ण श्रद्धांजली

सोलापूर, (क.वृ.): एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाने इथल्या लाल आणि काळ्या मातीशी दोस्ती केली. मातीत दाणे पेरल्या शिवाय आणि त्याची निगा राखल्याशिवाय पीक तरारून येत नाही. हे मातीलाच आपले सर्वस्व मानणार्या नानांनी ओळखले. मातीची शिकवण आयुष्याची शिकवण नानांनी मानली आणि सामाजिक, राजकिय आयुष्यास सुरुवात केली आणि प्रतिस्पर्ध्यांशी नेहमीच मैत्री केली. कुस्तीच्या फडात काय किंवा राजकिय आखाड्यात काय, जिंकले तरी पाय जमिनीवर ठेवणारे आणि हरले तरी न खचणारे, नाना खूपच नम्र आणि धाडशी. आयुष्यात येणार्या प्रत्येक आव्हानांना समर्थपणे आणि कलात्मक पद्धतीने नानांनी दिलेला लढा नेहमीच यशस्वी राहिला होता. कोरोना सारख्या राक्षसाच्या छाताडावर पाय देऊन नाना परत आले. नानांवर आपला लाडका नेता म्हणुन प्रेम करणार्या माझ्या सारख्या असंख्य तरुणांना आपले दैवत परत आल्याचा आनंद झाला. प्रबळ इच्छाशक्ती असणार्या नानांनी तब्येतीची काळजी घेत आपल्यावर प्रेम करणार्या प्रत्येकास काळजी घेण्याचे आवाहन केले. परंतु पुन्हा नानांना त्रास होऊ लागला. आपले आयुष्य आपले नाही, तर आपले आयुष्य जनसामान्यांचे आहे, याची जाणीव नानांना असल्याने नानांनी तात्काळ दवाखाना गाठला. डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली. कठीण परिस्थितीत आपल्या माणसासाठी आकाश पाताळ एक करणारे आदरणीय शरद पवार साहेब यांनी ही तळ ठोकला नाना बरे व्हावेत यासाठी. पण यावेळी नियती क्रूर वागली. नियतीने नानांना अकाली आपल्यापासून हिरावून घेतले. गेल्या काही दिवसांपासून नियती पंढरपूर करांशी क्रूरपणे वागत आहे. म्हणुन आधी कै. राजू बापू, त्यानंतर राजकारणातील संत श्रीमंत सुधाकरपंत परिचारक साहेब, त्यानंतर भागवताचार्य वा. ना महाराज यांना हिरावून घेतले. या दुःखातून या समाज धुरिणांवर प्रेम करणार्या माझ्या सारखे सावरत असतानाच नानांनाही नियतीने हिरावून घेतले ही बातमी ऐकली तेंव्हा धक्काच बसला कारण प्रत्येक संकटाशी करार करणारे, नाना प्रत्येक करार आपल्या बाजूने करून घेतात. यावर खात्री होती पण हा नानांचा करार फसला. यावर अजूनही विश्वासच बसत नाही.
माझ्यासारख्या आशावादी तरुणांना नाना नेहमीच आदर्श राहिले, कष्ट करण्याची पूर्ण तयारी, प्रामाणिक प्रयत्न, संयम, चिकाटी, लोकसंपर्क, लोकांत मिसळून लोकांना आपले करण्याची वृत्ती, लढवय्या स्वभाव, खिलाडू वृत्ती, मैत्रीची जाणीव राखणारे, शब्दांचे पक्के, शब्दांचे भक्त, उत्कृष्ट वक्ते, सामाजिक जाणीवांना जपणारे, प्रचंड आत्मविश्वास बाळगणारे या व असे अनेक गुण नानांच्या अंगी होते. या गुणांचा आदर्श माझ्या सारख्यां साठी नाना होते. अशा राजकारणा पलीकडील सर्व गुणांनी समृद्ध माणसाला म्हणजेच नानांना आपण मुकलो आहोत.
नानांच्या अकाली निधनाने दुःखाचा डोंगर भालके कुटुंबावर कोसळला आहे. या दुःखात सोमनाथ गायकवाड व परिवार सहभागी आहोत. या दुःखातून सावरण्याची शक्ति, धैर्य भालके कुटुंबीयांना परमात्मा विठ्ठल देवो आणि नानांच्या पवित्र आत्म्याला परमेश्वर सद्गती देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली - सोमनाथ गायकवाड व परिवार, (शेवते) पंढरपूर
0 Comments