Hot Posts

6/recent/ticker-posts

नाना ही कुस्ती पण चितपट व्हायला हवी होती

नाना ही  कुस्ती पण चितपट व्हायला हवी होती


पंढरपूर, (क.वृ): पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भारत नाना भालके रुबीमध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी वाचनात आली होती, आणि आज पहाटे नाना आपल्याला सोडून गेल्याचे ऐकल्यावर मन सुन्न झाले. 

पैलवान गडी ते आमदार हा नानांचा थक्क करणारा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. प्रथम आमदार झाल्यानंतर 'पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल' म्हणत नानांनी शपथ घेतली अन सभागृहात विठुरायाच्या नावाचा एकच गजर झाला होता. आज त्याच विठुरायाला आपल्या लोकनेत्याला संकटातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी अनेक ठिकाणी साकडं घालण्यात आले होते. 

शिवणे फेस्टीव्हल 2019 च्या उद्घाटन समारंभासाठी नाना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे नानांची भेट झाली. पहिल्या भेटीतच शिवजयंतीचा कार्यक्रम आहे,मी नक्की येणार असा शब्द नानांनी दिला. साधारण महिन्यानंतर कार्यक्रम पत्रिका फायनल झाल्यानंतर नानांची भेट घेण्यासाठी नानांच्या कार्यालयात गेल्यानंतर अवती भवती कार्यकर्त्यांचा गराडा असताना देखील आम्हाला पाहिल्यानंतर नानांच्या तोंडुन शब्द बाहेर पडले, तुमचा कार्यक्रम लक्षात आहे मी येणार आहे. त्या दिवशी नानांचा वाढदिवस होता.नेत्याचा  वाढदिवस म्हटलं की हारतुरे, सत्कार समारंभ या गोष्टी ठरलेल्या पण नानांनी मात्र स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील 16 कि.मी. कॅनल च्या दुरुस्तीचे काम अधिकार्यांकडुन करुण घेतल्याचे ऐकायला मिळाले.कुस्ती क्षेत्रात काम करत असताना नाना नेहमी आपल्यापेक्षा मोठ्या पैलवानासोबत कुस्ती करत राजकीय जीवनामध्ये ही नानांनी अनेक मुरब्बी राजकारण्यांना पाणी पाजले.मागे एकदा निवडणुकीनंतर "मी काही कच्च्या गुरूचा चेला नाही" म्हणतं दंड थोपटल्याचं पाहिलं होत. काल वस्ताद पवारसाहेबांनी रुबीमध्ये भेटून आपल्या शिष्याला काही डाव नक्कीच दिले असतील. नाना तुम्ही कोरोनाने घातलेल्या 'मोळी'तुन सुटका करून त्याला 'ढाक' मारून अस्मान दाखवायला हवं होत. हि कुस्ती चितपट व्हायला हवी होती. तुम्हाला  मी भारत तुकाराम भालके ईश्वर साक्ष शपथ घेतो की.. ही शपथ घेताना पहायचं होत ! स्वतःच्या हिमतीवर राजकारण, समाजकारामध्ये स्वताची ओळख निर्माण करणार्या नानांची एक्झीट निश्चितपणे मनाला चटका लावून जाणारी आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments