Hot Posts

6/recent/ticker-posts

चार जागांच्या चौदा जागा करण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील चांगले काम करणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना यापुढे संधीची अपेक्षा

 चार जागांच्या चौदा जागा करण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील
चांगले काम करणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना यापुढे संधीची अपेक्षा


मोहोळ नगरपरिषद रणधुमाळी भाग 2

मोहोळ (साहील शेख )(क.वृ.): नगरपरिषदेची सत्ता आल्यानंतर राज्यामध्ये विरोधी म्हणजे भाजप शिवसेनेची सत्ता होती. तरीही या कालावधीत तत्कालीन सर्वच पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्याचा प्रयत्न केला. मोहोळ नगर परिषदेसाठी निधीची कमतरता जाणवत आहे ही बाब अचूकपणे हेरून माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने या दोन्ही आजी-माजी आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करत मोहोळ शहरासाठी दहा कोटीचा निधी मिळवला. त्यामधूनच मोहोळ शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय. राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता असताना वरिष्ठ स्तरावरून निधी खेचून आणण्यासाठी यावेळी पक्षभेद विसरून एकदिलाने प्रयत्न होणे गरजेचे असताना राष्ट्रवादीला विरोधी पक्ष मानत भाजप शिवसेनेने त्यावेळी सातत्याने नगरपरिषदेत केवळ राजकारण आणि राजकारण करण्याचा प्रयत्न केला.

यापूर्वीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या विविध निवडीमध्ये कोणता निर्णय घ्यायचा याबाबत राजन पाटील यांनी नेहमीच सर्व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अनगर येथे बोलावून सर्वांना विश्वासात घेऊन राष्ट्रवादीच्या वाटचालीस पूरक ठरतील असे पक्षाभिमुख निर्णय घेतले.एक तर शब्द द्यायचा नाही आणि जर दिला तर त्या शब्दाला कितीही विरोध पक्षातून झाला तरी कोणत्याही परिस्थितीत तो शब्द पूर्ण करायचाच हा अनगरकरांचा राजकीय पायंडा राजन पाटील यांनी आजवर चालवत आणला. जसे राजन पाटील यांचे मोहोळ शहरावर लक्ष आहे तसेच मतदारसंघातील अनेक लहान मोठ्या घडामोडीवर देखील असते. मात्र अलीकडच्या काळात त्यांच्या जवळ वावरणाऱ्या  चिमूटभर स्वयंघोषित राजकीय तज्ञ सल्लागारांनी तालुक्यातील मुठभर कार्यकर्त्यांना नाराज करून संपुर्ण मतदारसंघात ओंजळभर राजकीय विरोधक तयार करण्याचे काम सुरू होते. त्यांचा डाव पद्धतशीर ओळखत राजन पाटील यांनी या विधानसभेला स्वतंत्र पॅरलल प्रचार यंत्रणा सक्रिय ठेवत हा विजय संपादित केला. त्याचा मोठा फायदा विद्यमान आमदार यशवंत माने यांनी करत नगर परिषदेचे  केवळ एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादीच्या माध्यमातून विकासकामांचे स्वप्न पूर्ण केले.

निवडणूक आली की राजन पाटील यांच्या विरोधात पडद्याआड काम करायचे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी व विश्वासघात करायचा आणि पक्षाचा विजय झाला की निष्ठावंताच्या अगोदर पक्षाचा अवसानघात व नेत्यांचा विश्वासघात करणारे खुषमस्करे  सर्वात पुढे जाऊन स्वतःच अंगाला गुलाल लावून नेत्यांसमोर विजयोत्सव करतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत अनुभवी कार्यकर्त्यांच्या ऐवजी मोहोळमधील प्रसिद्धी सल्लागारांचे सल्ले महत्त्वाचे मानले जाऊ लागले होते. विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी गोपनीय सल्लामसलत करणारे हेच ग्रामकेसरी सल्लागार राष्ट्रवादीच्या कट्टर विरोधकांचेही तज्ञ सल्लागार होते. पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गत गटबाजी वाढवून गैरसमजाचे वातावरण निर्मितीमध्ये याच सल्लागारांचा मोठा हात असे. ज्यांच्याकडून जास्त फायदा होईल त्यांच्या बाजूने सल्ला द्यायचा अन स्वार्थाचे उखळ पांढरे करून घ्यायचे अशी दुहेरी कूटनीती हे सल्लागार राबवत असत. शिवाय याच ढोंगी सल्लागारांनी या विधानसभेला राजन पाटील यांचा पराभव होईल असे भाकड भाकीतही चारचौघात केले होते. मात्र या निवडणुकीतील विजयामुळे तथाकथित भाकड भाकीतकारांचे मनसुबे धुळीस मिळाले. मात्र या सल्लागारांच्या डावपेचा बद्दलही येत्या काळात पक्षश्रेष्ठींनी क्राॅस चेकींग करणे आवश्यक आहे. तरच या पुढील काळात नगर परिषदेला  खऱ्या अर्थाने चांगल्या काम केलेल्या कार्यकर्त्यांचे मूल्यमापन होणार आहे.

मोहोळ शहराच्या राजकारणात यापुढील काळात राष्ट्रवादी'ला काही कठोर आणि तटस्थ निर्णय घ्यावेच लागणार आहेत. किमान आता तरी त्या चिमूटभर संकुचीत बुद्धीच्या सल्लागारांना श्रेष्ठींनी आता जरा बाजूस सारणे आवश्यक आहे. अशी भावना अनगरकर - पाटील कुटुंबीयावर निष्ठा व राष्ट्रवादीला पुनर्वैभव आणण्याची मनापासून इच्छा असणारे प्रामाणिक कार्यकर्ते बोलून दाखवताना दिसत आहेत. अन्यथा फंद-फितुरी आणि डबलगेमचे राजकारण करणाऱ्या संधीसाधू व मतलबी कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादीची गेल्या अनेक वर्षापासूनची असणारी अभेद्य ताकत येत्या काळात निश्चितपणे म्हणावी तशी वाढू शकणार नाही.

Reactions

Post a Comment

0 Comments