Hot Posts

6/recent/ticker-posts

पशुवैद्यकीय विभागाच्या हलगर्जीपणामुळे सांगोला तालुक्यातील पशुधन धोक्यात-अर्जुन लुबाळ

 पशुवैद्यकीय विभागाच्या हलगर्जीपणामुळे सांगोला तालुक्यातील पशुधन धोक्यात-अर्जुन लुबाळ

निष्क्रीय आणि कामचुकार तालुका विस्तार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे विभागावरील नियंत्रण सुटले



वाणी चिंचाळे (सचिन गायकवाड):- जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहे. पण याच शासनाच्या विविध प्रयत्नाला "खोडा" घालण्याचे कार्य खुद्द सांगोला तालुक्यात होताना दिसत आहे. शेतकऱ्याचे पशुधन वाढविण्यासाठी शासन विविध प्रोत्साहन पर योजना राबवित आहे,पण गेली एक वर्षभर तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे पशुसंवर्धन विभागाची एक ही योजना महुद आणि परिसरात या विभागाच्या वतीने राबविली नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन लुबाळ यांनी केला आहे. कधी ही महुद आणि परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेले तर ही दवाखाने "कुलूप बंद"अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे, तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,कधी त्यांचा फोन लागत नाही किंवा लागला तर शेतकऱ्यांना "उपदेशाचे डोस" ऐकावे लागत आहेत,या सर्व कारणांमुळे या विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. मात्र भले मोठे राजकीय वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे,आपले कोणीच काही करू शकत नाही, असा आव आणणाऱ्या तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अस्लम सय्यद शेतकऱ्यांच्या गोठ्यात जावून आपल्या विभागाच्या तक्रारी पहाव्यात अशी अपेक्षा तालुक्यातील पशुपालकांनी व्यक्त केली आहे.रिक्त असलेल्या नाझरा,चोपडी,वाकी (घेरडी) येथील पदे रिक्त आहेत,ती त्वरित भरावेत,अशी मागणी पशुपालकांतून व्यक्त केली आहे.


           सांगोला तालुक्यात गाई- एक लाख चार हजार, म्हैस- त्रेसष्ट हजार,शेळी--एक लाख एकवीस हजार,कोंबड्या-तीन लाख, अठ्ठावीस हजार,कुत्रा,ससा-अकरा हजार दोनशे,गाढव,उंट-228,वराह--173, घोडे,शिंगरू--111 एवढ्या पशुधन आहे. या वर चोवीस पशुवैद्यकीय केंद्रांतून नियंत्रण केले जात आहे.पशुधन विकास अधिकारी,आणि पशुधन पर्यवेक्षक हे या सर्व पशूंची काळजी हे घेतात.सध्या लंम्पी या विषाणूजन्य आजाराने मुक्या जनावरांना आणि पशुपालकांना हैराण केले आहे. जि.प.कृषी आणि पशुंसवर्धन सभापती अनिल मोटे आपले राजकीय "वजन"वापरून या विभागाला पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न करीत आहेत,मात्र या विभागातील अधिकारी आणि काही पशुवैद्यकीय डॉक्टर मात्र आपल्याच तोऱ्यात असल्याचे चित्र शेतकरी,पशुपालकांना दिसत आहे.कृषी व पशुसंवर्धन सभापती यांनी विषाणूजन्य आजारांवर मोफत लसीकरण करा,अशा सक्त सूचना सांगोला येथील बैठकीत दिल्या असताना अनेक पशुवैद्यकीय डॉक्टर बहाद्दरांनी शेतकऱ्यांना लुटले असल्याचा प्रकार अनेक गावांतील पशुपालकांनी नाव न सांगण्याच्या अटींवर सांगितले आहे. या संदर्भात तालुका पशुवैद्यकिय आधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनी वरून विचारणा केली असता कोणी घेतले आहेत?,त्याची लेखी तक्रार द्या,मग कारवाई करतो असे सांगून वेळ मारून नेली.
       महुद,पारे, वाकी-(घेरडी) शिवणे,अचकदाणी,नरळेवाडी,कोळा, नाझरा, चोपडी, आदि पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांची उपस्थिती फक्त राष्ट्रीय दिनालाच असल्याची खंत शेतकरी,पशुपालक व्यक्त करीत आहेत.मात्र या विभागातील मोजकेच आणि बोटावर मोजण्याइतकेच पशुवैद्यकीय डॉक्टर इमाने इतबारे पशूंची सेवा करीत आहेत. मात्र काही निष्क्रीय पशुवैद्यकीय डॉकटरांच्या अकार्यक्षमतेमुळे  खाजगी डॉक्टरांची मात्र चलती होत आहे.त्याचा आर्थिक फटका शेतकरी आणि पशुपालकांना होताना दिसत आहे. नाझरा येथील श्रेणी १ येथील पशु वैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद गेली दोन वर्षे रिक्त असून असंख्य पशुपालक शेतकऱ्यांनी विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे धाव घेवून आपली गाऱ्हाणी सांगून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त जागा भरण्याची मागणी केली आहे.पशुधन वाचविण्यासाठी आणि विषाणूजन्य आजारांसाठी जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या एक कोटी निधीचे आणि तालुक्याच्या वाट्याला आलेल्या लाखो रुपयांचे निधीचे "गौडबंगाल" पशुपालकांना उलगडले नाही. 
       येणाऱ्या काळात तरी पशुपालकांना योग्य सेवा देण्याचा प्रयत्न पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी करावा,अशी अपेक्षा तालुक्यातील पशुपालकांच्या  वतीने केली जात आहे.   

$$ वाकी (घेरडी) येथील पशु वैद्यकीय दवाखाना कायम कुलूप बंद अवस्थेत आहे.त्यामुळे अनेक शेतकरी आणि पशुपालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. या पशुवैद्यकीय केंद्राची जबाबदारी खुद्द डॉ अस्लम सय्यद यांच्याकडे असून ते स्वतः कधी ही हजर नसतात.पशुपालकांशी ते कधी ही संवाद साधत नाहीत. त्यामुळे अशा कामचुकार,मुजोर आणि निष्क्रीय अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी
        -  चिदानंद स्वामी (पशुपालक वाणी चिंचाळे) 


$$ सांगोला येथील लंपी या विषाणूजन्य  आजाराबद्दल शेतकरी, पशुपालक घाबरलेल्या अवस्थेत असून येत्या दोन दिवसात सांगोला येथे येवून सद्यस्थितीचा आढावा घेणार आहे. 
- नवनाथ नरळे (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी)
Reactions

Post a Comment

0 Comments