श्री विठ्ठल रुक्मिणीचे उद्यापासून 24 तास ऑनलाईन दर्शन

पंढरपूर (क.वृ.): दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी यात्रा दि. 26 नोव्हेंबर रोजी साजरी होत असल्याने भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेवून मंदिर प्रशासनाच्यावतीने गुरुवार दि. 19 रोजी परंपरेनुसार श्रींचा पलंग काढण्यात आला. तसेच उद्यापासून संकेतस्थळावर श्री विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरु ठेवण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
कार्तिकी यात्रा दि .16 नोव्हेंबर ते दि. 30 नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. दरवर्षी कार्तिकी यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून काल गुरुवार दि. 19 रोजी श्रीं चा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार गुरुवार सकाळी 11.55 वाजता परंपरेनूसार श्रीं चा पलंग काढण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून श्री ची काकड आरती, पोषाख, धुपारती, शेजारती हे राजोपचार बंद राहणार आहेत. मात्र नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता एवढेच राजोपचार सुरु राहणार आहेत.
श्रींविठ्ठला चा पलंग काढल्याने विविध संकेतस्थळावर ww.vitthalrukminimandir.org मोबाईल अँप - श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, पंढरपूर व जिओ टीव्ही,Tata Sky Dish Tv) उपलब्ध असलेले श्री चे दर्शन 24 तास सुरू ठेवण्यात येत आहे.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य शासनाने मंदिर भाविकांना दर्शनाकरीता खुले करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात असून शासकीय नियम व अटींच्या अधीन राहून कार्तिकी यात्रा यात्रा सोहळा सुस्थितीत पार पडावा अशी मागणी भाविकांमधून होत आहे. मात्र जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमिवर आषाढी यात्रा सोहळ्याच्या धर्तीवर कार्तिकी यात्रा सोहळा साजरा करावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र या प्रस्तावाला वारकरी सांप्रदायाचा विरोध असून वारकरी सांप्रदाय काय भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments