राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे दलालांचं सरकार - चेतनसिंह केदार सावंत

सांगोला (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने तीन ऐतिहासीक कृषी विधेयके मंजूर केली आहेत. मात्र ज्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांना कायद्याच्या नावाखाली बेड्या ठोकल्या होत्या त्याच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने या कायद्याला विरोध करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी विरोधी असलेलं राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे दलालांचं सरकार असल्याचा आरोप भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांनी केला.
शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने कृषी सुधारणा विधेयके लोकसभेत मंजूर करून घेतली आहेत. केंद्राची विधेयके लागू करणार नसल्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. हा निर्णय शेतकरीविरोधी असून याच्या निषेधार्थ सांगोल्यात भाजपच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर राज्य सरकारच्या अध्यादेशाची होळी करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत म्हणाले, शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, शेतमाल हमीभाव व शेती सेवा करार (सक्षमीकरण आणि संरक्षण) विधेयक आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) अशी तीन कृषी सुधारणा विधेयके म्हणजे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठीच्या दिशेने टाकलेले क्रांतिकारी पाऊल आहे. नव्या विधेयकात अन्नदात्या शेतकऱ्याला अनेक बंधनातून मुक्त केले असून त्यांना आपला शेतमाल विकण्यास अधिक स्वातंत्र्य व पर्याय उपलब्ध असतील. ही विधेयके शेतकऱ्यांसाठी कवच असणार आहे. कायदेशीर बंधनातून शेतकऱ्यांना मुक्त करणारे कायदे पारित झाल्याने आता शेतकऱ्यांना त्यांचा माल राज्याबाहेरही जिथे चांगले दर मिळेल तेथे, कंपन्यांसोबत करार करून विकता येणार आहे. त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे. वास्तविक ही तिन्ही विधेयके शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहेत. गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या असून त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. कायमच शेतकरी विरोधी भूमिका असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने केंद्राच्या कृषी सुधारणा विधेयकाला स्थगिती दिली आहे. राज्याचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा आहे. आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सध्याचं राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे दलालांचं सरकार असल्याची जळजळीत टीका भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार सावंत यांनी केली आहे. राज्य सरकारने कृषी सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी न केल्यास यापुढील काळात भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती संभाजी आलदर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.
0 Comments