चेतनसिंह केदार-सावंत यांनी घेतली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट

अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यात झालेल्या नुकसानीची दिली माहिती
सांगोला दि.१९(क.वृ.): सांगोला तालूक्यात यंदाच्या मोसमात सुमारे साडेपाच हजार मिलिमीटर पाऊस पडला आहे. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे सांगोला तालुक्यात तब्बल १४ हजार १७१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी अशी मागणी करत अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यात झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिह केदार सावंत यांनी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिली.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिह केदार-सावंत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यात झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. यावेळी खा. रणजितसिंह निंबाळकर, विधानपरिषद सदस्य आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, अक्कलकोटचे आ.सचिन कल्याणशेट्टी, माळशिरसचे आ.राम सातपुते यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सांगोला मंडलमधील ४ हजार २३४ शेतकऱ्यांच्या ३९०८.९० हेक्टर, जवळा मंडलमधील ६ हजार ४३४ शेतकऱ्यांच्या ३८१६.४० हेक्टर, जुनोनी मंडलमधील ६ हजार ७१८ शेतकऱ्यांच्या ४४११ हेक्टर, महूद मंडलमधील २ हजार ५१० शेतकऱ्यांच्या २०३५ हेक्टर, अशा तालुक्यातील १९८९६ शेतकऱ्यांच्या 14 हजार 171 हेक्टरवरील डाळिंब, द्राक्ष, केळी, ऊस, ज्वारी, बाजरी, उडीद, भुईमुग, मका, वांगी, कांदा, भाजीपाला व इतर पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे.
पंचनामे करताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना पिकांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागासाठी हेक्टरी १ लाख रुपये सरसकट नुसकान भरपाई देण्यात यावी. रोजगार हमी कामगारांना प्रतिदिन ४०० रुपये पगार करावा, मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत तालुक्यातील शंभर शेतकऱ्यांनी शेततळी पूर्ण करूनही शासनाने शेततळ्याचे अनुदान दिले नाही, पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेतील गेली दोन वर्षे निधी उपलब्ध नसल्याने या योजनेचा निधी तातडीने शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिह केदार सावंत यांनी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
0 Comments