सत्तेत आल्यानंतर आघाडी सरकारला धनगर आरक्षणाचा विसर पडला - चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत

सांगोला दि.३(क.वृ.): सत्तेत येण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ अशा वलग्ना केल्या. मात्र सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला धनगर समाजाच्या आरक्षणाचा विसर पडला आहे. केवळ फसव्या घोषणा करण्यात राज्य सरकार मग्न असून राज्य सरकारने धनगर आरक्षणाकडे दुर्लक्ष करून धनगर समाजावर अन्याय केल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांनी केला आहे.
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण पेटलं असून ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. दरम्यान आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाजही आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही तर राज्य सरकार आणि धनगर समाजातील संघर्ष अटळ आहे. दरम्यान धनगर आरक्षणाबाबत बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत म्हणाले, धनगर समाज आरक्षणावरून आक्रमक झाला असताना समाजातील कोणत्याही नेत्यांशी बोलायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. धनगर समाजाला सरकारकडून दुजाभावाची वागणूक मिळत आहे. सरकारमधील काही नेते जेव्हा विरोधात होते तेव्हा धनगर समाजाचा पुळका घेऊन त्यांनी विधानसभेत धनगरी वेशभूषेत आरक्षणाची मागणी केली होती. आता सत्तेत आल्यानंतर त्यांना धनगर आरक्षणाचा विसर पडल्याचं दिसत आहे. आघाडी सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी राज्याच्या २०१९-२० अर्थसंकल्पात स्वतंत्र अशी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. तर या समाजासाठी तब्बल २२ योजना सुरू केल्या होत्या. राज्याच्या आजपर्यंतच्या अर्थसंकल्पात धनगर समाजाच्या उन्नतीसाठी इतके भरीव अर्थसाहाय्य कधीच मिळाले नव्हते. आतापर्यंत फक्त भाजपने धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर राज्यातील धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय 30 जुलै 2019 रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी, शिवसेना व काँगेसच्या नेत्यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पण या एक वर्षाच्या काळात आघाडी सरकारला आरक्षणाबाबत फार भरीव पावले टाकता आलेली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेने धनगर समाजाचा वापर फक्त राजकारणासाठी केला आहे. धनगर समाजाला भाजप सरकारने एक हजार कोटी रुपये दिले. मात्र त्यानंतर आघाडी सरकारने जाणीवपूर्वक एक रुपयांची देखील तरतूद केली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला धनगर आरक्षणाचा विसर पडला असून आघाडी सरकारमधील नेते जनतेची फसवणूक करत असून वलग्ना करण्यासाठी तरबेज असल्याची टीका भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांनी केली आहे.
0 Comments