खावटी अनुदान योजनेसाठी खाते उघडण्याचे आवाहन

सोलापूर, दि.५(क.वृ.): कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय करण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरू करायची असल्याने अनुसूचित जमातीमधील परित्यक्त्या, विधवा, घटस्फोटित महिला, भूमिहीन शेतमजूर, अपंग कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब यांनी बँक किंवा पोस्टात खाते उघडावे. तसेच आधारकार्ड काढण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी डी.पी. बोकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
खावटी अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना चार हजार प्रती कुटुंब अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये दोन हजार रूपयांच्या वस्तू आणि दोन हजार बँक किंवा पोस्ट खात्यात जमा करण्यात येणार आहेत. मात्र सोलापूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील बऱ्याच जणांचे आधारकार्ड, बँक पासबुक नाहीत.
या योजनेंतर्गत मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर, आदिम जमाती सर्व कुटुंबे, पारधी जमातीची सर्व कुटुंबे, जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंबे. (यामध्ये परित्यक्त्या, विधवा, घटस्फोटित महिला, भूमिहीन शेतमजूर, अपंग कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब), वैयक्तिक वनहक्कधारक कुटुंबे या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे.
अनुसूचित जमातीच्या लाभार्थी कुटुंबाकडे आधारकार्ड बँक किंवा पोस्ट खात्याला संलग्न केलेले असावे, नसेल तर करून घ्यावे. रेशनकार्ड नसणाऱ्यांनी संबंधित तहसीलदार यांच्याकडे रेशनकार्ड मिळण्यासाठी अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी शासकीय आश्रमशाळा होटगीचे मुख्याध्यापक बी.जे. वाघमारे (9881986838) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. बोकडे यांनी केले आहे.
0 Comments