Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी कलाशिक्षकांची भूमिका महत्त्वाची - धनाजीराव साठे

विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी कलाशिक्षकांची भूमिका महत्त्वाची - धनाजीराव साठे


जिल्हा कलाध्यापक संघाची माढा तालुका कार्यकारिणी जाहीर ; तालुकाध्यक्षपदी आण्णाराव खंडागळे

माढा (क.वृ.): आजच्या स्पर्धेच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या प्रत्येक कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलेमुळेच जीवन आनंदी व सुखकर आणि यशस्वी बनते त्यामुळे प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचे ज्ञानाबरोबरच विविध कलागुण विकसित करण्यासाठी कलाशिक्षक आवश्यक आहेत त्यामुळे शासनाने प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळेत प्रशिक्षित कलाशिक्षक नियुक्त करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माढ्याचे माजी आमदार धनाजीराव साठे यांनी व्यक्त केले.

ते उपळाई खुर्द ते माढा रोडवरील सावली हॉटेल येथे सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघाची माढा तालुका कार्यकारिणी जाहीर व पदग्रहण समारंभात बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून माढेश्वरी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशोकशेठ लुणावत उपस्थित होते.

पुढे बोलताना साठे म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेले शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदानित धोरण शासनाने त्वरित बंद केले पाहिजे.काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना वेतन वेळेवर मिळाले पाहिजे परंतु दुर्दैवाने ते मिळत नाही त्यामुळे आज विनावेतन शैक्षणिक काम करणाऱ्या अनेक शिक्षकांची कौटुंबिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे अशा शिक्षकांना अनुदान मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून शिक्षक संघटनांनी सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा केला पाहिजे असे आवाहन केले.

याप्रसंगी बोलताना माढेश्वरी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशोकशेठ लुणावत म्हणाले की, विविध कलांमुळेच मानवी जीवन समृद्ध बनते तसेच जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यास मदत होते त्यामुळे तालुक्यात प्रथमच स्थापन झालेल्या कलाध्यापक संघाच्या माध्यमातून विविध स्तरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धांचे वेळोवेळी आयोजन करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी आर्या पब्लिक स्कूलचे कलाशिक्षक आण्णाराव खंडागळे माढा तालुकाध्यक्ष,उपाध्यक्ष वैभव गायकवाड,सचिव नितीन कांबळे, खजिनदार राहुल चंदनकर,सागर कुंभार,प्रशांत चोपडे,दशरथ माने, अतुल लंकेश्वर यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिपक कन्ना, उपाध्यक्ष गणेश तडका,सचिव देवेंद्र निंबर्गीकर,माजी जि.प.सदस्य झुंजार भांगे, संदीप शिंदे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, सुधीर देशमुख, श्रीकांत वेदपाठक, नितीन विधाते,विजयकुमार गुंड, महेश केदार यांच्यासह तालुक्यातील कलाशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून मारुती शिंदे यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments