नव्या इमारतीच्या जागेवरून मोहोळ नगर परिषदेत आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध
आठ विरुद्ध पाच मतांनी आठवडा बाजार जागा मंजूर
मतदानाला उपनगराध्यक्षांसह चार दिग्गज नगरसेवक गैरहजर
मोहोळ (क.वृ):- मोहोळ नगरपरिषदेच्या नवीन जागेची इमारत निश्चित करण्यासाठी गुरुवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वसाधारण मासिक बैठकीमध्ये ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष शाहीन शेख होत्या.यामध्ये एकूण १३ जणांनी ऑनलाईन कॉन्फरन्सला ऑनलाईन उपस्थित राहून मतदान केले. त्यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी आघाडीच्या नगराध्यक्ष शाहीन शेख, रमेश बारसकर, सरिता सुरवसे,शौकत तलफदार , संतोष खंदारे, दत्तात्रय खवळे, मनीषा फडतरे, सुवर्णा गाढवे आठ नगरसेवकांनी आठवडा बाजार या जागेच्या निश्चीतीसाठी मतदान केले. तर विरोधी शिवसेना आघाडीच्या नगरसेविका सीमा पाटील, गटनेते महादेव गोडसे, राणी गोडसे, नसीमा बोंगे, अनिता सोनटक्के या पाच जणांनी आहे त्या जुन्या नगर परिषदेच्या ठिकाणी नवी इमारत होण्यासाठी मतदान केले. विशेष बाब म्हणजे या निवडणूक प्रक्रियेपासून राष्ट्रवादीचे नूतन उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे यापूर्वीचे गटनेते प्रमोद डोके, राष्ट्रवादीचे नगरसेवक अर्चना संतोष वायचळ, शिवसेना नगरसेवक अतुल गावडे, आणि भाजप नगरसेवक सुशील क्षीरसागर हे चार नगरसेवक या मतदान ऑनलाइन
प्रक्रियेला प्रक्रियेला चक्क अनुपस्थित होते. आठवडा बाजार या जागेला आठ नगरसेवकांनी बहुमतानी पसंती दिल्यामुळे प्रशासन स्तरावरून ही जागा निश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असल्याचे समजते. शिवसेनेचे स्विकृत नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी राष्ट्रवादी आघाडीने घेतलेल्या निर्णयाला कडाडून विरोध केला असून या विरोधात व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. सध्याच्या आठवडा बाजाराच्या ठिकाणी नवी इमारत उभारून मोहोळचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा चांगला भरणारा आठवडा बाजार लहान करून तालुक्यातील अन्य गावचा आठवडी बाजार मोठा करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे असेही सत्यवान देशमुख म्हणाले.
मोहोळ नगर परिषदेसाठी नव्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्यासाठी यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये आहेत या नगरपरिषद इमारतीच्या पाठीमागील दोन गट क्रमांक, तसेच जुनी भाजी मंडई आणि आठवडाबाजार अशा चार गट क्रमांकाच्या जागा सुचवण्यात आल्या होत्या. मात्र काही जागांना विरोधी पक्षातील नगरसेवकांनी विरोध केल्यामुळेच याबाबत निवडणूक प्रक्रिया आज झाली.
नगरपरिषदेचे धोरणात्मक निर्णय बहुमताने घेण्याचे अधिकार नगरसेवकांना असतात. या निर्णय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचा अथवा मतदानाबाबत मत व्यक्त करण्याचा अधिकार आम्हा प्रशासनाला नाही मात्र अशा निर्णयाबाबत अभिप्राय देण्याचा अधिकार नगरपरिषदेच्या आम्हा प्रशासकीय घटकांना आहे.
एन के पाटील
मुख्याधिकारी
मोहोळ
यापूर्वीच्या मासिक बैठकीमध्ये चार जागांसाठी ठराव घेण्यात आले होते. चार जागांपैकी जुन्या जागेतील दोन गट क्रमांक १६७०, १६७१ हे महाराष्ट्र शासनाच्या नव्या असून ते नगरपरिषदेच्या नावे करण्यासाठी व प्रशासकीय पूर्तता होण्यासाठी विलंब लागत होता. तर नव्या इमारतीसाठी भाजी मंडईची जागा अपुरी पडत आहे. इमारतीसाठी मंजूर होऊन आलेला निधी परत जाऊ नये म्हणून त्यामुळे आठवडा बाजार या जागेला बहुमताने पसंती देण्यात आली आहे. या ठिकाणी सुसज्ज इमारत तर होईलच मात्र पार्किंग देखील प्रशस्त उपलब्ध होईल. हा निर्णय ऑनलाइन मतदान प्रक्रियेने बहुमताने झाला आहे त्यामुळे विरोधक करत असलेले राजकारण शहर विकासाच्या दृष्टीने दुर्दैवी म्हणावे लागेल.
शाहिन शेख
नगराध्यक्षा मोहोळ
मोहोळ नगर परिषदेची नवीन इमारत आहे ह्या ठिकाणी म्हणजेच मध्यवर्ती ठिकाणी व्हावी ही प्रामाणिक इच्छा असून पक्षातील काही अडचणीमुळे मिटींगला गैरहजर राहिले असून याचा कोणीही गैर अर्थ काढू नये आजही आम्ही इमारत आहे त्या ठिकाणी व्हावे या मतावर ठाम आहोत.
अर्चना वायचळ
राष्ट्रवादी नगरसेविका
0 Comments