सीमा शुल्क पुणेच्या अंमली विरोधी पथकाने


सोलापूर, दि.६(क.वृ.): दि. ४ ऑक्टोबर २०२० रोजी, सोलापूर शहरा जवळील तांदूळवाडी येथे, तब्बल चारशे किलो गांजा जप्तीची धाडसी कारवाई केली. सदर गांजा आंध्रप्रदेशातील खम्मम जिल्ह्य़ातून महाराष्ट्रात विक्री साठी आणण्यात येत होता असे समजते. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी, गांजा वाहतूक केल्या जाणाऱ्या वाहनाचा कुठलाही तपशील माहिती नसतानाही, वेगवेगळ्या ठिकाणांहून संकलीत केलेल्या विशिष्ठ माहितीच्या व तंत्रज्ञानाच्या आधारे सदर गुन्ह्यात सहभागी असणारे हे वाहन शोधून काढलं आणि ही जप्तीची कारवाई यशस्वी केली, हे या कारवाईचं वैशिष्ट्य ठरावं. या माहितीच्याच आधारे संबंधीत अधिकाऱ्यांनी ३ ऑक्टोबर च्या सायंकाळ पासून नळदुर्ग - सोलापूर रस्त्यावर पाळत ठेवली.
४ ऑक्टोबर च्या सकाळी साडेसातच्या सुमारास तांदूळवाडी येथे मालवाहतूक करणारी वाहने थांबवून तपासणी सुरू असताना नळदूर्गच्या दिशेने आलेला एक आयशर कंपनीचा ट्रक येऊन थांबला पण तपासणीसाठी तो पुढे न आल्याचं पाहून अधिकाऱ्यांनी जेंव्हा ट्रक जवळ जाऊन पाहिलं तेंव्हा ट्रकचं इंजिन चालू असलेल्या अवस्थेत असल्याचं दिसलं पण ट्रक मध्ये वाहनचालक किंवा सहचालक नसल्याचं आढळले. ट्रकची दोन्ही दारे सुद्धा उघडीच असल्याचेही आढळले. त्या ट्रकचा संशय आल्याने ज्या ढाब्यासमोर तो ट्रक उभा होता तिथल्या लोकांकडे चौकशी करता त्याविषयी कोणालाही काही कल्पना नसल्याचे दिसले. हे वाहन काही वेळापूर्वी इथे नव्हते असेही त्या लोकांनी अधिकाऱ्यांना सांगितले. बराच काळ या ट्रकशी संबंधीत वाहनचालक किंवा इतर कोणीही न आल्याने, सदर ट्रकची संशयावरून अधिकाऱ्यांनी जेंव्हा कसून तपासणी केली तेंव्हा ट्रकच्या छतावरच्या भागात एक विशिष्ट प्रकारची पोकळी तयार करून त्यात कागद आणि प्लॅस्टिक चिकटपट्टीने गुंडाळलेली पाकिटे लपवलेली आढळली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर, सदरचा ट्रक बेवारस असल्याचे मानत कायदेशीर कारवाई करत, पुढील कारवाई साठी, सोलापूरच्या सीमा शुल्क कार्यालयात आणण्यात आला व तेथे ट्रकमध्ये लपवून आणलेला माल उतरवण्यात आला. यानंतरच्या पंचासमक्ष केलेल्या कारवाईत ट्रकमध्ये गांजाची एकूण २०६ पाकीटे लपवलेली आढळली. या गांजाचे एकूण वजन ४१२ किलो आणि त्याची अंदाजे किंमत रू. ६५ लाख असल्याचे कळते.
या कारवाईत सीमा शुल्क विभागाने, गांजा व वाहतूकसाठी वापरलेला ट्रक अशी एकूण पंच्याऐंशी लाख रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ट्रक मध्ये मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे गाडीच्या मालकाची माहिती मिळाली असून त्याआधारे पुढील तपास व शोध घेतला जात आहे असे कळते. तपासाअंती यामागचे गुन्हेगार व सुत्रधार कोण आहेत हे कळेल असा विश्वास या मोहिमेत सहभागी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सीमा शुल्क विभागाद्वारे सोलापूर शहर व जिल्हा परिसरात, अंमली पदार्थांची वाहतूक-खरेदी-विक्री विरोधात केलेली ही आजवरची सर्वात मोठी व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी ठरली आहे. सीमा शुल्क पुणे आयुक्त श्री. पी. के. बेहरा व संयुक्त आयुक्त श्रीमती. वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईचे नेतृत्व सहायक आयुक्त श्री. अलोक कुमार सिंह यांनी केलं. तर अधिक्षक श्री. मदन देशमुख, अधिक्षक पवन करवंदे, अधिक्षक श्री प्रमोद जाधव, वरिष्ठ निरीक्षक श्री. अमजद शेख, हवालदार श्री भरत पवार यांनी या कारवाईत भाग घेतला. या प्रकरणात पुढील तपास चालू असल्याचे कळवण्यात आले आहे.
0 Comments