मोहोळमध्ये 'नो मास्क-नो एन्ट्री' व्यापाऱ्याचा निर्णय

पोखरापूर दि.६(क.वृ.): मोहोळ शहर व तालुक्यात कोरोना बाधिताची संख्या वाढत असून, त्यावर चेंबर ऑफ कॉमर्स ने जनजागृती करण्यास पुढाकार घेत मोहोळ शहरात व दुकानात माल खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्यास मास्क घालून येणे बंधनकारक करण्यात आले आहे. "नो मास्क-नो एन्ट्री" चा ठराव मोहोळ चेंबर ऑफ कॉमर्सच्या आयोजित केलेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे.
त्यास व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अशी माहिती मोहोळ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रविण डोके यांनी दिली. मोहोळ शहरामध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स मोहोळ च्या वतीने प्रत्येक दुकानदाराला व ग्राहकांना "मास्क नाही तर दुकानात प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही". सुरक्षित अंतर ठेवा, मास्क सर्वांना बंधनकारक आहे, सॅनीटायझर वापर आणि शारिरीक अंतर ठेवा, अशा आशयाचे फलक प्रत्येक दुकानात लावणे आहेत. त्यामुळे आता ग्राहक व दुकानदार हे दोघेही आपआपली काळजी घेताना दिसत आहेत. मोहोळ शहरांमध्ये कोरोना विषाणू मुळे अनेकांचा मृत्यू झालेला आहे, त्यात काही व्यापाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनामुळे अनेकांना दवाखान्यात दाखल होऊन लाखो रुपयांचा खर्च करावा लागत आहे कोरोना संशयित आहे किंवा नाही, आपल्याला होईल किंवा नाही हे लक्षात येत नसल्यामुळे प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी स्वतः घ्यावी यासाठी नगरपरिषदेने मास्क नाही तर गावात प्रवेश नाही, मास्क न घालता गावात फिरताना दिसला तर त्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, तसेच जो दुकानदार बिगर मास्क वापरता व्यापार करताना आढळला तर संबधित दुकान पाच दिवस बंद करायची कारवाई करावी लागेल अशा सूचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चेंबर ऑफ कॉमर्स मोहोळच्या वतीने मास्क नाही तर दुकानात प्रवेश नाही, मास्क नाही तर कुठल्याही प्रकारची सेवा दिली जाणार नाही असा ठराव संमत करण्यात आला.
0 Comments