इथे निष्पापांचे जीव जात आहेत..
तुम्ही अधिकारी नेमकी कामे करता काय ?
महामार्ग प्रशासनाला आमदार माने यांचा संतप्त सवाल

मोहोळ दि.११(क.वृ.): इथे निष्पापांचे जीव जात आहेत. तुम्ही अधिकारी नेमकी कामे करता काय ? आंदोलनाची वेळ येईपर्यंत इतका हलगर्जीपणा कसा ? सर्वात जास्त लांबीचे महामार्ग हे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून जातात. रस्ते हे विकासाच्या समृद्धीचे जरी मार्ग असले तरी या रस्त्याच्या समस्येमुळे सर्वसामान्यांना त्रास होता कामा नये. त्यामुळे महामार्गावरील दुरुस्तीबाबतच्या समस्या अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. शेटफळ ते पाकणी दरम्यान चांगल्या प्रतीचे सर्विस रस्ते महामार्ग प्रशासनाने त्वरित वरिष्ठ स्तरावरून मंजूर करून पूर्ण करावेत. त्याचबरोबर बंद अवस्थेत असलेले महामार्गावरील पथदिवे सुरू करावे. सावळेश्वर टोल नाक्यावरील रोख पथकर घेण्याच्या लेन वाढवून या ठिकाणची वाहतुकीची कोंडी टाळावी. महामार्गावरील वाढते अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याच्या स्पष्ट सूचना मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
सावळेश्वर टोल नाक्यावरील वाढती वाहनांची गर्दी आणि महामार्गावरील इतर समस्या संदर्भात माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांनी दोन दिवसापूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मोहोळ विश्रामगृहावर मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी तहसीलदार जीवन बनसोडे,युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महामार्ग प्रशासनाचे अधिकारी अनिल विपत आणि अविनाश पाटील यांच्यासमवेत बैठक लावून यावर सविस्तर चर्चा केली.
टोलनाका असो अथवा महामार्गावरील इतर कोणत्याही समस्यामुळे निष्पापांचे जीव जातात.जर नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर तुमच्या महामार्ग प्रशासनाचे अधिकारी नेमकी कामे करता काय असे म्हणत आमदार माने संतापले ? कोल्हापूर, आळंदी महामार्गाच्या कामां दरम्यान ऐंशी टन वजनाची वाहनांमुळे गावपातळीवरचे रस्ते उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे अशा ठेकेदारांवर त्वरीत कारवाई करण्याची सूचना तहसीलदार जीवन बनसोडे यांना दिल्या. खड्डे पडलेल्या लहान रस्त्यांना आता निधी कोठून आणायचा ? असाही संतप्त सवाल यावेळी आमदार मानेंनी उपस्थित केला.
यावेळी पं.समीती अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, माजी सभापती नागेश साठे, ज्ञानेश्वर चव्हाण इत्यादी उपस्थित होते. यावेळी महामार्ग संदर्भातील सर्विस रस्ते, दिवाबत्ती यासंदर्भातल्या महत्त्वपूर्ण बाबी आमदार यशवंत माने यांनी महामार्ग, टोल प्रशासनाच्या अधिकार्यांच्या निदर्शनास आणून देऊन याबाबत त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. खड्डे पडल्यानंतर महामार्ग दुरुस्तीची कामे दर्जेदार करण्याची मागणी यावेळी अजिंक्यराणा पाटील यांनी आवर्जून केली. त्याचबरोबर शेटफळ, अनगर फाटा, मोहोळ शिवाजी चौक, सावळेश्वर ज्या ज्या ठिकाणी भुयारी मार्ग आणि दुभाजक आहेत तेथील बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू करावे असेही मागणी अजिंक्यराणा यांनी मांडली.
0 Comments