देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षकांकडून अविरतपणे सुरू - गटशिक्षणाधिकारी मारुती फडके

माढा दि.८(क.वृ.):- देशाला प्रगतीपथावर व विकासाच्या दिशेने नेण्यासाठी मुख्य आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे शास्त्रज्ञ, संशोधक, सैनिक, डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, इंजिनिअर, वकील याच्यांसह विविध क्षेत्रातील अधिकारी आपल्या अध्यापन व समुपदेशन प्रक्रियेच्या माध्यमातून घडविण्याचे महत्त्वाचे कार्य पिढ्यांनपिढ्या सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांकडून अविरतपणे सुरू असल्याने कर्तृत्ववान,कृतीशील आणि गुणी शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन वर्षांतून किमान एकदा तरी केला पाहिजे असे मत माढ्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी व्यक्त केले.
सध्याच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या आणि मनोरंजनाच्या युगात भावी पिढी कोठेही भरकटू नये तसेच कोणत्याही चुका घडू नयेत म्हणून ज्याप्रमाणे आई-वडील सातत्याने प्रयत्नशील असतात त्याप्रमाणे प्रत्येक शाळेतील शिक्षक माझा विद्यार्थी ज्ञान, संस्कार,शिस्त व गुणवत्तेने परिपूर्ण होऊन तो स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात त्यामुळे अशा गुणी व कर्तृत्वसंपन्न शिक्षकांचा सन्मान शासनाबरोबर समाजातील सुज्ञ लोक व सामाजिक संस्थांनी 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून केल्यास शिक्षकांना आणखी प्रेरणा व नवीन उर्जा मिळू शकते त्याचबरोबर आपल्या कार्याचा सन्मान केल्याची जाणीव शिक्षकांच्या मनात राहून तो अधिक जबाबदारीने शैक्षणिक प्रकिया राबवतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. वास्तविक पाहता प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु प्रत्येकालाच लगेच यश मिळते असे नाही तरीदेखील न खचता, न थांबता सकारात्मक विचार करून पुढे आपले योगदान सुरू ठेवले पाहिजे. शिक्षण क्षेत्रात ईष्ट व गुणात्मक स्पर्धा आवश्यक आहे याकरिता चांगले काम करणाऱ्यांना प्रेरणा व प्रबलन देण्यासाठी गौरव केला पाहिजे.कोणत्याही पुरस्काराचे स्वरुप किंवा रक्कम महत्त्वाची नसते तर त्यापाठीमागची देणा-यांची भूमिका व हेतू महत्त्वाचा असतो. प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पगार किंवा मानधन मिळतेच परंतु आत्मिक समाधान मिळावे, नव्याने प्रेरणा व स्फूर्ती मिळावी म्हणून आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणा-या व्यक्तींचा वेळोवेळी यथोचित सन्मान होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
0 Comments