Hot Posts

6/recent/ticker-posts

राजकीय दुष्काळ संपला आता दिपकआबांच्या मदतीनेच तालुक्यातील पाण्याचा दुष्काळही संपविणार : आमदार शहाजीबापू पाटील

राजकीय दुष्काळ संपला आता दिपकआबांच्या मदतीनेच तालुक्यातील पाण्याचा दुष्काळही संपविणार : आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला दि.२७(क.वृ.): गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केलेल्या निर्णायक मदतीमुळेच सांगोला तालुक्याचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला राजकीय दुष्काळ संपविण्यात यश मिळाले. आता दिपकआबांच्या मदतीनेच तालुक्याचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला पाण्याचा दुष्काळही संपवणार असे प्रतिपादन सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले. बुद्धेहाळ ता सांगोला येथे पाणी पुजनानिमित्त ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा आमदार दिपकआबा साळुंखे पाटील मा सभापती संभाजी आलदर, शाखा अभियंता लक्ष्मण केंगार ॲड. उदय घोंगडे, दगडू बाबर पोपट यादव, दीपक खटकाळे यांच्यासह बुद्धेहाळ व कोळा परिसरातील नागरिक उपस्थित होते.

पाणीप्रश्न हा सांगोला तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न समजला जातो गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांना आमदार करण्यात सिंहाचा वाटा उचलून दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्यात राजकीय परिवर्तन घडवून आणले होते. हाच धागा पकडून शहाजीबापू बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले दिपकआबामुळेच सांगोला तालुक्याचा राजकीय दुष्काळ आणि बापूंचा राजकीय वनवास संपला आता त्यांना सोबत घेऊनच सांगोला तालुक्यातील गंभीर असलेला पाणीप्रश्न मार्गी लावून संपूर्ण तालुका सुजलाम सुफलाम करणार. कष्ट करण्याची प्रचंड तयारी असूनही केवळ पाणी नसल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रचंड हेळसांड होत होती ही बाब लक्षात घेऊन विधानसभा निवडणूक झाल्यापासून तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी दिपकआबा व शहाजीबापू पाटील यांनी शासकीय पातळीवर वारंवार पाठपुरावा केला होता अखेर या दोघांचे सातत्यपूर्ण प्रयत्न व महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचे असलेले अचूक नियोजन यामुळेच आज सांगोला तालुक्यातील माण, कोरडा व अफ्रुका या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर तालुक्यातील चिंचोली, बुद्धेहाळ व पारे या ठिकाणी असलेले तलावही तुडूंब भरले आहेत अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची असलेली मागणी पहिल्याच वर्षी पूर्ण झाल्याने आणि वरुणराजाने ही त्यांना तितकीच साथ दिल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

पाण्यासाठी आता जास्त संघर्ष किंवा प्रतीक्षा करावी लागणार नाही 1998 नंतर म्हणजे तब्बल 22 वर्षांनी प्रथमच बुद्धेहाळचा तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांना तब्बल 22 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. यापुढील काळात शेतकऱ्यांना संघर्ष किंवा अशी प्रतीक्षा करावी लागणार नाही. याची काळजी घेऊ आणि दरवर्षी सांगोला तालुक्यातील सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यासाठी कटिबद्ध राहू : मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील

स्वर्गीय आमदार काकासाहेबांच्या आठवणींना उजाळा
स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी आपल्या कालखंडात सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे योगदान दिले होते त्यांच्या काळातही येथील पिण्याच्या व शेतीचा पाणी प्रश्न अंतिम टप्प्यात आला होता परंतु दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले आणि हा प्रश्न अर्धवट राहिला आज त्यांच्या निधनानंतर तब्बल 45 वर्षांनी कोळा व बुद्धेहाळ परिसरातील काकांसोबत काम केलेल्या वयोवृद्ध नागरिकांनी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या कार्याची आवर्जून आठवण काढली

Reactions

Post a Comment

0 Comments