नीरा उजवा, टेंभू म्हैशाळ योजनेतील भूसंपादनाची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी - आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला दि.५(क.वृ.): सांगोला तालुक्यातील नीरा उजवा कालवा, टेंभू म्हैसाळ योजनेमध्ये सुरू असलेल्या कामांचे जमिनीचे तातडीने भूसंपादन करून त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नीरा उजवा कालवा, टेंभू म्हैसाळ या योजनांची कामे बहुतांशी पूर्ण झाली असून काही कामे होणे बाकी आहे या कामांसाठी बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत काही शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम मिळाली होती, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची भूसंपादनाची कार्यवाही प्रलंबित असल्याची तक्रार अनेक शेतकर्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे केली होती, आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्वरित दखल घेऊन भूसंपादन अधिकारी सोलापूर, उपविभागीय अधिकारी मंगळवेढा, सहाय्यक संचालक नगर रचना सोलापूर, भुमिअभिलेख सांगोला,यांच्यासह नीरा उजवा कालवा,टेंभू म्हैसाळ योजनेचे सर्व कार्यकारी अभियंता यांची बैठक आयोजित केली केली होती.
या बैठकीमध्ये सर्व शासकीय कार्यालयांनी एकमेकांशी समन्वय ठेवून प्रलंबित असणाऱ्या सर्व भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करुन घ्यावी व शेतकऱ्यांची भूसंपादनाची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या वेळी माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ प्रा. संजय देशमुख सर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन शैलेश सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी मंगळवेढा उदयसिंह भोसले,सहाय्यक संचालक नगर रचना सोलापूर श्री प्रभाकर नाळे, भुमिअभिलेख अधीक्षक सांगोला तळपे, यांच्यासह निरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले, टेंभूचे कार्यकारी अभियंता सचिन पवार, उपकार्यकारी अभियंता अजटराव,म्हैशाळचे उपकार्यकारी अभियंता कर्नाले, उप अभियंता प्रगती यादव, आदि उपस्थित होते.
0 Comments