पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन ; स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण
सोलापूर, दि.१५(क.वृ.): जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबवले जात आहेत. त्यासाठी 424 कोटी रुपयांचा आराखडा आखण्यात आला आहे. सर्वांगीण विकासासोबतच जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस पथकाने मानवंदना दिली. यावेळी श्री. भरणे यांनी जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्री. भरणे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून व्यापक प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूचा दर कमी करण्यात यश आले असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही याचप्रमाणे यश येईल. कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून भरीव निधीची तरतूद केली असून राज्य स्तरावरुनही भरघोस निधी दिला जाईल.
जिल्ह्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत होण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे बळकटीकरण करण्यावर भर देण्यात येईल. खास महिला आणि मुलांसाठीच्या स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी लवकरच पूर्ण करण्यात येईल. साथरोग नियंत्रण रुग्णालय सुरु केले जाणार असून उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मनुष्यबळ आणि औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सोलापूर जिल्हा शेतीवर अवलंबून आहे. कृषी औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख अधिक दृढ होण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पेरणीखालील क्षेत्र वाढले आहे. ही बाब अतिशय समाधानाची आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री विमा योजनेस चांगला प्रतिसाद दिला आहे. शेती आणि शेतकरी सक्षम व्हावे यासाठी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी, कृषि यांत्रिकीकरण, गट शेतीस प्रोत्साहन, मागेल त्याला शेततळे या योजनाना चांगले यश मिळत आहे, असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील रस्ते विकासाचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. पालखी मार्गांना महामार्गांचा दर्जा देण्यात आला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने या रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांसाठीचे भूसंपादन गतीने करण्यात आले आहे. भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली असून गावांतील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पालकमंत्री पाणंद रस्ते योजना प्रभावीरित्या राबवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत असून शेतकऱ्यांना संगणकीकृत सात बारा उतारे दिले जात आहेत. स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील दहा गावांची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जमिनींचे उतारे झटपट मिळण्यासाठी राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत सातबारा उताऱ्यांसोबत 8/अ उताराऱ्यांचेही संगणकीकरणाचे काम सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.
वनक्षेत्र वाढविण्यासाठी यंदा सुमारे अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पावणेतीन लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट्य आहे. वृक्ष लागवडीच्या या मोहिमेत नागरिकांनी उर्फूस्ंचतपणे सहभाग नोंदवून विकासात योगदान देण्याचे आवाहनही श्री. भरणे यांनी केले.
यावेळी महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य, महानगरपालिका यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments