Hot Posts

6/recent/ticker-posts

शाश्वत ग्रामीण विकासासाठी कृषी पर्यटन महत्त्वपूर्ण: रोहना

 शाश्वत ग्रामीण विकासासाठी कृषी पर्यटन महत्त्वपूर्ण: रोहना

विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन परिषदेस प्रारंभ
सोलापूर दि.७(क.वृ.): भारत हा कृषीप्रधान देश असून ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यासाठी तसेच रोजगार निर्मिती व गोरगरीबांच्या भल्यासाठी आणि शाश्वत ग्रामीण विकासासाठी कृषी पर्यटन केंद्रे महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असा विश्‍वास श्रीलंका येथील माजी कुलगुरु डॉ. रोहना पी. एम. यांनी व्यक्त केला. 
शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ग्रामीण विकास आणि पर्यावरणशास्त्र विभागाकडून 'कोविड काळामधील वातावरणातील बदल आणि ग्रामीण विकास' या विषयावर आयोजित चार दिवसीय आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन डॉ. रोहना यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यात प्र-कुलगुरू डॉ देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, अर्थ संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. एस. एस. सूर्यवंशी, यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. पुरातत्वशास्त्र विभाग प्रमुख डॉ. माया पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
डॉ. रोहना म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाची उत्पादकता वाढवून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. कृषी पर्यटन केंद्रांमधून शेतकऱ्यांनी शेतात पिकलेला माल नागरिकांना थेट विक्रीच्या स्वरूपात देऊ शकतात, त्याचा फायदा दोन्ही घटकांना होतो आणि यातूनच ग्रामीण विकासासाठी हातभार लागतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगारी आपोआप कमी होत ग्रामीण भागाचा चौफेर विकास होऊ शकतो, असेही डॉ. रोहना यांनी सांगितले.
कुलगुरु डॉ. फडणवीस म्हणाल्या, कृषी पर्यटनाबरोबर आपण इको पर्यटनालाही जोडलेले आहोत. विद्यापीठात त्यासंदर्भाचा कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये रोजगाराच्या अनेक संधी आहेत. कृषी पर्यटनामध्ये आयटी व इतर क्षेत्राशीही आपण जोडले जातो. त्याअंतर्गत कृषी पर्यटनाचा आपण विकास करू शकतो. कोविडच्या काळात मेडिको टुरिझम या नव्या क्षेत्राचा उदय झालेला आहे. कृषी भागात चांगले हवामान देऊन शरीर व मन तंदुरुस्त ठेवण्यासंदर्भात मेडिको टुरिझमचा फायदा होऊ शकतो. या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांसाठी रोजगार निर्मिती उपलब्ध होऊ शकते. ऍग्रो प्रीनीयरची संकल्पना आता राबवली पाहिजे. हवामानातील होणाऱ्या बदलाची माहिती कृषी व पर्यावरण तज्ञांना मिळाली तर निश्चितच देशाचा विकास होऊ शकतो, असा विश्वास कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध 13 देशातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी दिली. या कार्यक्रमाचे आभार पर्यावरणशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. विनायक धुळप यांनी मानले. आता उद्या 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता म्यानमार येथील डॉ. रवीकुमार सिन्हा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments