भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या मागणीला यश

कोल्हापूर- मनमाड किसान रेल्वे 21 ऑगस्ट पासून सुरू होणार
सांगोला (जगन्नाथ साठे)दि.२०(क.वृ.): सांगोला तालुक्यात उत्पादित होणाऱ्या डाळिंब, बोर, द्राक्ष यासह भाजीपाला व फळांना दिल्लीची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सांगोला मार्गे दिल्ली ट्रेन सुरू करावी अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी खा.रणजितसिंह निंबाळकर व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्याकडे केली होती. तसेच त्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन रेल्वे सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. या मागणीला यश मिळाले असून रेल्वे मंत्रालयाने भाजीपाला व फळांची वाहतूक करण्यासाठी कोल्हापूर ते मनमाड दरम्यान किसान रेल गाडी क्र. 00109 ही गाडी सुरू करण्यास हिरवा कंदील दिला असून 21 ऑगस्ट पासून किसान रेल्वे सुरू होणार आहे.
7 मार्च रोजी पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगोल्यासह आसपासच्या तालुक्यात उत्पादित होणाऱ्या डाळिंबाला दिल्लीची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सांगोला मार्गे दिल्ली ट्रेन सुरू करावी अशी मागणी केली होती. यावर खा. रणजितसिंह निंबाळकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्यासह रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांनी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान चेतनसिंह केदार-सावंत यांनी मुंबई येथे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन भाजीपाला व फळांची वाहतूक करण्यासाठी सांगोला मार्गे दिल्ली रेल्वे सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. या मागणीला यश मिळाले असून रेल्वे मंत्रालयाने भाजीपाला व फळांची वाहतूक करण्यासाठी किसान रेल सुरू करण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे.
21 ऑगस्ट पासून नाशवंत कृषी मालाच्या भाजीपाला व फळांची वाहतुक करण्यासाठी किसान रेल्वे गाडीची सेवा सुरूवात करण्यात येणार आहे. सोलापुर आणि पुणे विभागामधील कोल्हापुर, सांगली, सोलापुर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील डाळींब, केळी, द्राक्षे, भाजीपाला, फुले, कांदे अशा भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना या किसान रेल्वेचा मोठा फायदा होणार आहे. या रेल्वेमुळे छोट्या शेतकरी- व्यापाऱ्यांच्या कृषी उत्पादनांच्या वाहतुकीची गरज भागणार आहे.
कोल्हापूर-मनमाड मार्गावरील सर्व थांब्यावर नाशवंत मालाची लोडिंग आणि अनलोडिंग करण्याची परवानगी दिली आहे. ही सेवा सुरूवातीला आठवड्यातून एकदा असणार आहे. गाडी क्र. 00109 ही
कोल्हापुरहून निघेल, मिरज, सांगोला, पंढरपुर, कुर्डुवाडी, दौंड आणि अहमदनगर या स्थानकावर थांबेल. सदर गाडीचे डब्बे गाडी क्र. 00107/00108 देवलाली-मुझफ्फरपूर-देवलाली गाडीला मनमाड रेल्वे स्थानकावर जोडले व काढले जातील. यामुळे प्रयागराज चौकी, न्यु चौकी (अलहाबाद चौकी), दिनदयाल उपाध्य (मुगलसराय), बक्सर, दानापुर (पटणा) आणि मुझफ्फरपुर या परिसरात नाशवंत कृषी माल पाठविण्यात येईल.
किसान रेल गाडी क्र. 00109 कोल्हापुर ते मनमाड ही गाडी कोल्हापुरहून 21 ऑगस्ट रोजी सकाळी 05.30 वाजता प्रस्थान करेल. गाडी क्र. 00110 मनमाड ते कोल्हापुर या गाडीचे मनमाडहून 23 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता प्रस्थान होईल. या किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांना भाजीपाला व फळे इतर बाजारपेठेत सहज व सुरक्षितरित्या पाठवणे शक्य होणार असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगितले.
0 Comments