नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीचे कर भरावेत- शिवतेजसिंह
कोरोनाच्या उपाययोजना व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सहकार्याची गरज
अकलूज दि.२७(क.वृ.):कोरोना अर्थात कोव्हीड 19 या महाभयंकर संसर्गजन्य आजाराचा सामना करण्याच्या उपाययोजना करण्यासाठी व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी गावातील नागरिकांनी स्वतः पुढे येऊन आपल्याकडील कर भरावेत असे आवाहन अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.
कोरोना सारख्या महासंकटाचा सामना करण्यासाठी गेल्या पाच महिन्या पासून अकलूज ग्रामपंचायत विविध उपाययोजना करत आहे. ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा "कोव्हीड वोरीयर्स" बानून आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. असे असताना ग्रामपंचायतीची कर वसुली मात्र ठप्प आहे. ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत कोणत्याही प्रकारच्या कर वसुलीसाठी सक्ती केली नाही व करणार ही नाही. परंतु कोरोनासाठीच्या उपाययोजना बरोबरच कर्मचाऱ्यांच्या घर प्रपंचासाठी ग्रामपंचायतीला कररुपी निधीची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः हुन पुढाकार घेत आपल्याकडील कर अर्थात घरपट्टी, पाणीपट्टी व गाळा भाडे भरून सहकार्य करावे असे आवाहन सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.
यासाठी ग्रामपंचयतीने ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सुविधा केली असून घरपट्टी व गाळा भाडे भरण्यासाठी शंकरराव मोहिते पाटील बँकेच्या खाते नंबर 0020002010001019 या खात्यावर तसेच पाणीपट्टी भरण्यासाठी शंकरराव मोहिते पाटील बँकेच्याच खाते नंबर 0020002010001304 या खात्यावर भरून कोव्हीड योद्धयाच्या संसारासाठी हातभार व कोरोनासाठी लढणाऱ्या ग्रामपंचायतीला अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच शिवतेजसिंह यांनी केले आहे.
0 Comments