Hot Posts

6/recent/ticker-posts

आयुक्तांच्या आदेशाच्या निषेधार्थ विडी कामगारांचे तीव्र निदर्शन

आयुक्तांच्या आदेशाच्या निषेधार्थ विडी कामगारांचे तीव्र निदर्शन

राज्यात इतर जिल्ह्यात विडी कारखाने सुरु तर सोलापुरात का बंद? -कॉ. नरसय्या आडम (मास्तर)



सोलापूर :-  विडी कारखाने चालू करण्यासंदर्भात सोलापूर महानगर पालिका आयुक्त यांनी काढलेले आदेश हे विडी उद्योग चालविण्याच्या दृष्टीने योग्य नसून उलटपक्षी जटील करणारे आहे. कारण सोलापूर शहरातील जवळपास ६५ ते ७० हजार महिला विडी कामगारांपर्यंत विडी तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल पान,तंबाखू पोहोचविण्यासाठी कारखानदारांकडे यंत्रणा नाही आणि ते शक्यही नाही. महाराष्ट्रात संगमनेर, जालना, अहमदनगर, अकोला, पुणे, नागपूर या ठिकाणी विडी कामगार कारखान्यात जाऊन कच्चामाल घरी आणून विड्या वळून विड्यांचे खेप कारखान्यात देण्याची मुभा आणि कारखानदारांना विक्री करण्यास कायदेशीर परवानगी दिलेली आहे. मात्र सोलापुरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा विषय पुढे करत जे आदेश काढले त्या आदेशामुळे उद्योग सुरु करणे अशक्य आहे. राज्यात इतर जिल्ह्यात विडी कारखाने सुरु तर सोलापुरात का बंद? असे अनेक सवाल कामगारांमधून येत आहेत. सोलापुरातील विडी कामगारांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून दत्त नगर येथील लाल बावटा कार्यालय येथे महिला विडी कामगारांनी मोठ्या संख्येत येऊन कांहीही करून विडी कारखाने चालू करायला सांगा अशी विनवणी ज्येष्ठ कामगार नेते कॉ. आडम मास्तर यांच्याकडे केली. तद्नंतर सिटूचे राज्य महासचिव अॅड. एम.एच.शेख यांनी गर्दीला संबोधित करताना विडी कामगारांनी उत्स्फूर्त घोषणाबाजी केली. 

रविवार दि. ७ जून रोजी सोलापूर महानगरपलिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी काढलेले आदेश मागे घेऊन विडी कामगारांना विडी कारखान्याच्या ब्रँच मधूनच कच्चामाल देऊन ब्रँचमधेच विड्यांचे माप घेण्यात यावे हि मागणी घेऊन दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे विडी कामगारांनी स्वयंस्फूर्तीने
*भूक लगी है! काम दो! आयुक्त साहब होश में आयो! कारखाने चालू झालेच पाहिजे! सर्वाना काम, सर्वाना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे! सी.आय.टी.यू. जिंदाबाद! कामगार एकजूटीचा विजय असो!* अशा घोषणा देत तब्बल १ तास निदर्शने करून आयुक्तांच्या आदेशाचा निषेध व्यक्त केले. 
यावेळी विडी कामगारांना मार्गदर्शन करताना कॉ. आडम मास्तर म्हणाले कि, विडी कामगारांना किमान वेतन मिळत नाही. प्रत्येक विडी कारखान्यात गुल्लाकट्टा २५ ते ५० विडी, छाटविडी १००-२०० विडी, खराब पानपुडा, तंबाखू कपात याबाबत वर्षानुवर्षे सरकार व प्रशासनाकडे तक्रार व जनआंदोलने करूनसुद्धा अद्याप एकही फौजदारी गुन्हा कारखानदारावर दाखल केलेले नाही. आणि आज अचानक कारखानदाराव कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे सुतोवाच आयुक्त करत आहेत. आजच का कायद्याची अमलबजावणी करावे असे सुचू लागले. कामगारांना काम देताना प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने वाटेल ती बंधने कारखानदारांवर लादावे. मग यामध्ये तोंडाला मास्क, शारीरिक अंतर, हात व परिसर निर्जंतुकीकरण या सूचनांचे १०० टक्के पालन विडी कामगार करतील. 
सोमवार दि. ८ जून रोजी कारखाने सुरु न झाल्यास सर्व विडी कारखान्यांसमोर कामगार उपोषणाला बसतील. आणि १० जून रोजी सोलापूर महानगर पालिकेला घेराव घालतील. 
यावेळी माजी नगरसेविका कॉ. नसीमा शेख, कॉ. सुनंदा बल्ला, कॉ. सलीम मुल्ला, गंगुबाई कनकी, गीता वासम, अशोक बल्ला, अनिल वासम, दीपक निकंबे, सनी शेट्टी,  आदिसह शेकडो विडी कामगार महिला  उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments