Hot Posts

6/recent/ticker-posts

आरोग्य कर्मचाऱ्यावरील हल्ल्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला निषेध

आरोग्य कर्मचाऱ्यावरील हल्ल्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला निषेध


सोलापूर (क.वृ.):- उत्तर सोलापूर तालुक्यातील भोजप्पा तांडा या वस्तीवर कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे, उत्तर सोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. कुलकर्णी व डॉ.गोडसे संबंधित तांडा वस्ती सील करण्याकरिता गेले असता, त्यांच्यावर वस्तीवरील एका तरुणाने हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकारी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचा सदस्य उमेश पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. 
पाटील पुढे म्हणाले की, संबंधित तरुणाने यापूर्वी देखील सदर तांडा वस्तीवर सर्वेक्षणासाठी आलेल्या आशा सेविकेवर हल्ला केला होता. सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण असून,नागरिकांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना व रस्त्यावर उतरून स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याची आवश्यकता असताना, समाजातील काही विकृती प्रवृत्ती विक्षिप्त पद्धतीने वागत आहेत. काही लोकांच्या अशा वागण्यामुळे शासकीय यंत्रणेच्या कामावर दुष्परिणाम होऊन कोरोणाचे संकट दूर करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे मनोधर्य खचण्याची शक्यता आहे.त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संबंधित हल्ला करणाऱ्या तरूणावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.
आशा सेविका,आरोग्य सेविका प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, सिविल हॉस्पिटल मधील डॉक्टर व इतर सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांच्या जीवाचे रक्षण करण्याकरिता अहोरात्र काम करत असताना,त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे. पोलीस प्रशासन,महसूल प्रशासन प्रशासकीय यंत्रणेतील सर्व कर्मचारी,आपापल्या स्तरावर कोरोणा विरुद्धची लढाई निर्धाराने लढत आहेत.ज्या पद्धतीने तुमचा आमचा जीव महत्त्वाचा आहे,तसाच या रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा जीव देखील महत्वाचा आहे. तरीही हे सर्व कर्मचारी मागील तीन महिन्यापासून दिवस-रात्र करोणाच्या संकटा विरुद्ध लढा देत आहेत. त्यांना सहकार्य करणे, पाठिंबा देणे व मदत करणे हे आपले कर्तव्य असताना,काही लोक त्यांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करत आहेत.अशा समाजद्रोही लोकांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.
कोरोणा विरुद्धच्या लढाईत अग्रभागी असलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना व शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आश्वस्थ करू इच्छितो की, यापुढील काळात जर एखाद्या समाजकंटकांने आपणास त्रास देण्याचा, धमकावण्याचा किंवा मारहाण करण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ माझ्या 98 81 740 950 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. मी तात्काळ जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांना संपर्क करून, पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्या सुरक्षेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करेन. आपण आपले कर्तव्य अतिशय उत्तम पणे बजावत आहात. आपण काम करत आहात म्हणून आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. याची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षेची काळजी घेणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे.कृपया आपण निश्चिंत होऊन आपली जबाबदारी यापुढे देखील नेटाने पार पाडावी व सोलापूर जिल्ह्याला लवकरात लवकर करोणाच्या संकटातून बाहेर काढावे,असे आवाहनही उमेश पाटील यानी शेवटी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments