खासगी दवाखाने तात्काळ सुरु करा- जिल्हाधिकारी
सोलापूर : खासगी दवाखाने तत्काळ सुरु करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींना केले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आयएमए च्या प्रतिनिधींशी खासगी दवाखाने सुरु करण्याबाबत चर्चा केली. यावेळी विशेष अधिकारी पी. शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, आयएमएचे डॉ. हरिष रायचूर, डॉ. सचिन मुळे त्याचबरोबर डॉ. जयंती आडके, डॉ. विठ्ठल धडके आदी उपस्थित होते.
शहरातील खासगी दवाखाने बंद असल्यामुळे सिव्हील हॉस्पिटलवर नॉन कोव्हीड पेशंटचा ताण वाढत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी खासगी दवाखाने सुरु करण्याचे आवश्यकत असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सांगितले. काही डॉक्टरांनी दवाखाने सुरु करण्याची तयारी दर्शिवली आहे. पण काही डॉक्टर दवाखाने सुरु करण्यास अनुत्सुक असल्याचे दिसते. मात्र आयएमए च्या प्रतिनिधीनी सर्व सदस्यांना दवाखाने सुरु करण्यास सांगितले आहे. प्रशासनाला खासगी दवाखान्याची अत्यंत आवश्यकता असून, दवाखाने तत्काळ सुरु करावेत. जेणे करुन कारवाई करण्याची गरज पडणार नाही, असे श्री. शंभरकर म्हणाले.
दरम्यान महानगरपालिकेमार्फत प्रतिबधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बोल्ली मंगल कार्यालय, अशोक चौक, सत्यविजय कन्व्हेशन हॉल, एमआयडीसी, उत्साद फंक्शन हॉल, बापूजी नगर येथे निवारा केंद्र करण्यात आली आहेत, असे पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले.
0 Comments