नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी रात्री ९ वाजता वीज घालवून दिवे लावून एकतेचा संदेश द्यावा असे आवाहन जनतेला केले आहे. मात्र यावर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आक्षेप घेत ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास किंवा कमी झाल्यास फ्रिक्वेन्सीमध्ये अनावश्यक बदल होऊन ग्रीड खराब होईल. त्यामुळे जनतेने वीज घालवताना विचार करावा, अशी शंका उपस्थित केली होती. यावर आता भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिली आहे.
ते म्हणाले की, कमीजास्त वीजपुरवठ्याचे नियोजन करणे सहजशक्य आहे. तसेच असे नियोजन करण्यासाठी सरकारकडे पुरेसा वेळ आहे. नितीन राऊत यांनी पॉवर ग्रीड आणि वीजपुरवठा खंडित होण्याबाबत केलेले आवाहन हे दिशाभूल करणारे आहे. गेली पाच वर्षे मी ऊर्जामंत्री म्हणून काम पाहत होतो. या काळात वीजेचा कमीजास्त पुरवठा करण्याचे प्रसंग अनेकदा आले. आपल्याकडील कोयना, घाटघर सारख्या वीजप्रकल्पात काही मिनिटांमध्ये वीजपुरवठा कमीजास्त करता येण्याची क्षमता आहे.
दरम्यान मोठ्या प्रमाणात पावर डिमांड असलेल्या महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात वीज फेल्युरमुळे परिणामी सर्व पावर स्टेशन बंद पडल्यास "मल्टी स्टेट ग्रीड फेल्युर" होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवा, हॉस्पिटल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
0 Comments