देश संकटात असताना एकमेकांविरोधात राजकीय संघर्षाची ही वेळ नाही - शरद पवार
राजकारणात राजकीय संघर्ष आपण नेहमी करत असतो. त्यात चुकीचे नाही. त्या गोष्टी चालतच असतात परंतु संपूर्ण देशावर आज संकट आले आहे. त्यावेळी एकमेकांच्या विरोधात संघर्ष करण्याची ही स्थिती नाही. आणि म्हणून कोण कुठल्या पक्षाचे सरकार आहे किंवा दिल्लीत कुठल्या पक्षाचे राज्य आहे हे आजच्या घडीला महत्वाचे नाही. तर आज आपण सगळ्यांनी मिळून कोरोनाचा पराभव करायचा हा एककलमी कार्यक्रम आपल्यापुढे आहे त्यामुळे त्यादृष्टीने पावले टाकली पाहिजेत आणि अस्वस्थ असलेला समाजातील जो घटक आहे त्याचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना दिला आहे.
राज्यातील व देशातील जनतेच्या मनात चिंता निर्माण झाल्याने बुधवारी चौथ्यांदा शरद पवारांनी जनतेशी संवाद साधला. संबंध देशातच नव्हे तर विश्वात एकाच विषयाची चर्चा आहे ती म्हणजे कोरोनाची. कोरोनामुळे प्रचंड संकट व्यापक प्रमाणात देशावर आले आहे. त्याबाबतचा सामना धैर्याने व योग्यपध्दतीने नियोजन करून केला पाहिजे. जागतिक पातळीवर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी होते आणि भारतसरकार, राज्यसरकार, संपूर्ण शासकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातील घटक, डॉक्टर्स, नर्सेस व त्यांचे सहकारी कोरोनाला पराभूत करण्यासाठी धैर्याने उभे आहेत असेही शरद पवार म्हणाले.
देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला काही सूचना केल्या. काही कार्यक्रमांची मांडणी केली. त्यांनी जी भूमिका मांडली त्याला तुमची माझी जबाबदारी आहे की, पूर्णपणे सहकार्य करण्याची खबरदारी घेतली पाहिजे असेही शरद पवार यांनी आवाहन केले. पंतप्रधानांनी राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांशी, देशातील पक्ष व नेते यांच्याशी संपर्क साधला व सुसंवाद केला. आणि एकत्रित या संकटाशी सामना करण्यासंदर्भात चर्चा केली असेही शरद पवार यांनी सांगितले. पंतप्रधानांनी जी भूमिका घेतली तीच भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आहे. उध्दव ठाकरे आपल्याशी सातत्याने सुसंवाद ठेवत आहेत तसेच इतर राज्यातील मुख्यमंत्री सुसंवाद ठेवत आहेत, धीर देत आहेत असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी 14 एप्रिलपर्यंत देशाचा लॉकडाऊन जाहीर केला होता. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन 3 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला व तशी भूमिका जाहीर केली. त्यांच्या या भूमिकेला सर्व राज्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता 3 मेपर्यंत सहकार्य करायचे आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेने आपल्याकडे वेगळी परिस्थिती असली तरी एकंदरीत कोरोनाची लागण झाली आहे आणि हे चित्र चिंताजनक आहे असे सांगतानाच देशात 11 हजार 439 रुग्ण कोरोना बाधित आहेत तर 1 हजार 306 रुग्ण हॉस्पिटलमध्ये बरे होवून घरी गेले आहेत आणि 377 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये विशिष्ट वयाचे आणि अन्य आजाराने बाधित असल्याने कोरोनाचा प्रभाव जास्त झाला व ते मृत्यूमुखी पडले असल्याची माहितीही शरद पवार यांनी दिली.
अमेरीका, स्पेन, इटली यांच्याशी तुलना करत नाही तिथले चित्र भयावह आहे. आपल्या देशातील लोकांचे वैशिष्ट्य असे आहे की, शारीरिकदृष्ट्या संकटाला सामोरे जाण्याची प्रतिकारशक्ती आहे ती भारतीयांमध्ये अधिक आहे असे जाणकार सांगतात. त्यामुळे युरोप, अमेरिका, इटलीशी तुलना योग्य नाही परंतु जी काही संख्या आली आहे ती संख्या आपल्याला चिंताजनक आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.
सरकार ज्या काही उपाययोजना करत आहे. त्या प्रकारची पावले टाकली जात आहेत. वैद्यकीय सहाय्य घेण्यासंदर्भात खबरदारी घेतली जात आहे. अन्नधान्यासंदर्भात पुर्तता करण्याचीही खबरदारी घेतली आहे. याबरोबरच कष्ट करणारा कामगार वर्ग आहे. दुर्दैवाने काम थांबले आहे पण शक्यतो त्यांना कामावर ठेवले पाहिजे असे आवाहन पंतप्रधानांनी देशातील उद्योजकांना केले आहे. त्याठिकाणी अंमलबजावणी केली जात आहे. शेतकरी व शेती यांचा दैनंदिन जो कार्यभाग आहे तो ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत त्याला लोकांचे सहकार्य मिळेल असेही शरद पवार म्हणाले.

No comments:
Post a Comment